Beed, 15 September : भाजप आमदार लक्ष्मण पवारांनी लोकांना भावनिक करू नये. पराभवाच्या भीतीपोटी रडण्यापेक्षा लढून पडा. तुम्ही कार्यकर्त्यांसोबत कसे वागलात, हे जवळून पाहिल्याचे एकेकाळी त्यांचे कार्यकर्ते राहिलेल्या सय्यद समीर यांनी टोला लगावला आहे. तर, त्यांचे विरोधक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनीही ‘आपल्या निष्क्रियतेचे खापर आमदार पवारांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर फोडू नये,’ अशी तोफ डागली आहे.
गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार (BJP MLA Laxman Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी आपण किंवा कुटुंबातील कोणीही आगामी निवडणूक लढविणार नाही, असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी याबाबत पालकमंत्र्यांसह स्वत:च्या पक्षाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले आहे. त्यांच्या भूमिकेवर आता विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे.
आमदार लक्ष्मण पवार यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून काम केलेले आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) असलेले समीर सय्यद यांनी त्यांना थेट रडू नका, लढून पडण्याचा सल्ला दिला आहे. निवडून येणार नाहीत, हे माहित झाल्यानेच तुम्ही ही भूमिका घेतली आहे. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्यांवर तुम्ही अन्याय केला. आमच्या घरातील कुणाचे निधन झाल्यावरही तुम्ही भेटीसाठी आला नाहीत, दवाखान्यात उपचार घेणाऱ्यांची साधी विचारपूसही केली नाही, धीर दिला नाही.
तुम्ही, तुमचे पीए सुधारले, कार्यकर्त्यांना मात्र गरीब ठेवले. तुम्ही म्हणता तहसीलदार, पोलिस अधिकारी, बीडीओ मागितला होता, तेही दिले नाही. तुम्ही तरी कुठे कार्यकर्त्यांची तहसील, पोलिस स्टेशन, दवाखान्यांतील कामे केलीत का, असा सवाल करत सय्यद समीर यांनी तुम्हाला फोन लावला तर मी बोलनार नाही असे स्पष्ट सांगत होता. तुम्ही 2014 ते 2019 काळात प्रामाणिक कामे केली म्हणता. मग तुमचे मताधिक्य ६५ हजारांवरून सहा हजारांवर का आले, असा सवालही केला आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनीही पवारांच्या भूमिकेवर टीका केली. मतदारांनी दहा वर्षे आमदार म्हणून तुम्हाला संधी दिली, नेतृत्वानेही भरभरुन दिल्याने त्यांनी सत्तेची फळे चाखली. लोकांना संकट काळात गरज होती, त्यावेळी यांनी स्वत:ची दारे बंद करुन घेतली. आता ही व्यक्ती निवडणुकीचे रणांगण सोडून पळून जात आहे. स्वत:च्या निष्क्रियतेचे खापर आमदारांनी पालकमंत्र्यांवर फोडु नये, असे पंडित म्हणाले.
तुम्हाला आजच राजकारण किळसवाणे का वाटू लागले. दहा वर्षांच्या आमदारकीमध्ये मतदार संघातील 196 गावांत आपण एकदाही फिरकला नाहीत, त्यामुळे ऐन निवडणुकीत लोकांना तोंड दाखवायलासुद्धा जागा उरली नाही. केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी असले स्टंट जनता खपवून घेणार नाही, असा इशाराही पंडित यांनी दिला.
भ्रष्टाचाराशिवाय दुसरा उद्योग केला नाही, त्यामुळे त्यांच्यावर निवडणुकीचे रणांगण सोडून पळून जाण्याची दुर्देवी वेळ आली आहे. आता काही जवळचे बगलबच्चे अंदोलनाची नौटंकी करतील आणि पुन्हा एकदा त्याच नौटंकीच्या जीवावर हे लोक राजकारणात सक्रीय होतील; परंतु जनता जनार्धन सुज्ञ आहे. असल्या नौटंकीबाजांच्या भूलथापांना मतदार भीक घालणार नाहीत, असेही विजयसिंह पंडित यांनी सुनावले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.