

Shivsena News : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपसह सर्वच पक्ष स्वबळावर लढत आहेत. ओवेसी, उद्धव ठाकरे, अकबरोद्दीन, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर, हर्षवर्धन सपकाळ या सगळ्यात नेत्यांच्या शहरात, मेळावे सभा झाल्या. ओवेसींनी तर शहरातच ठाण मांडले आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल सभा झाली. भाषण सुरू असतानाच तिथे एक पंतग येऊन पडला. यावर पंतग कोणाची निशाणी आहे रे, जलीलची ना? पतंग कापला, पतंग कापला, अशा शब्दात शिंदे यांनी एमआयएमची खिल्ली उडवली.
एकनाथ शिंदे यांनी एमआयएमला हलक्यात घेतले, याचे कारण शिवसेनेची टक्कर ही मुळात त्या पक्षाशी नाहीच. शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान असणार आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपचे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेत एकनाथ शिंदे यांनाच लक्ष केले होते. भाजपने थेट टीका करणे टाळले असले तरी त्यांचे स्थानिक नेते पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर तुटून पडले आहेत. शिवसेनेच्या महापालिका प्रचाराची धुराही शिरसाट यांच्याच खांद्यावर आहे.
उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर लगेच एकनाथ शिंदे यांची टीव्ही सेंटर भागात सभा झाली. नेहमीचेच मुद्दे आणि विकासाचे दावे करणारे शिंदे यांचे भाषण मतदारांवर किती प्रभाव टाकू शकतात हे 16 तारखेच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. दरम्यान, अकोट, परळी नगरपालिकेत एमआयएमला सोबत घेत आघाडी केल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठली होती. संभाजीनगरच्या सभेत भाषणाच्यावेळी जेव्हा एक पतंग शिंदे यांच्या समोर येऊन पडला, तेव्हा त्यांनी पतंग कोणाची निशाणी आहे? जलीलची ना, आम्ही त्यांचा पतंग कापला, असे म्हणत टाळ्या मिळवल्या.
यावर इम्तियाज जलील यांनीही पलटवार केला. संक्रांतीच्या शुभेच्छा देताना तुम्हाला पतंगच उडवावा लागणार आहे, असा टोला इम्तियाज यांनी आपल्या भाषणातून शिंदे यांना लगावला. ही भाषणबाजी आणि टोलेबाजी केवळ मनोरंजनच ठरणार आहे. कारण शिवसेना आणि एमआयएम यांच्यात कुठेही थेट लढत होत नाहीये. एमआयएमचे सगळे उमेदवार हे मुस्लिमबहुल भागात लढत आहेत. तर शिवसेनेचे हिंदू मतदारांचे प्राबल्य असलेल्या भागात. शिवसेनेने नाही म्हणायला 115 पैकी 96 हून अधिक वार्डात उमेदवार दिले आहेत. पण हिंदू बहूल भाग सोडला तर बाकी उमेदवार नावालाच असणार आहे.
एमआयएम-शिवसेनेची एकमेकांवर टीका ही आपापली वोट बँक सांभाळण्यासाठीच सुरू आहे. शिंदेंच्या शिवसेनेला खरे आव्हान असणार आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राज्याच्या महायुतीतील प्रमुख असलेल्या भाजपचे. युती तोडल्याचे खापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वी शिवसेनेवर फोडले होते. तर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपचा अहंकार आणि हट्ट युती तुटण्याला कारणीभूत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपला एकमेकांच्या विरोधात लढतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षालाही तोंड द्यावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.