Kailas Patil News : मंत्रिमंडळाची बैठक शेतकऱ्यांसाठी की गोकुळच्या सत्तेसाठी? ठाकरेंच्या आमदाराचा सरकारला सवाल!

Gokul Milk Union decision News : दुष्काळाच्या गंभीर पार्श्वभूमीवर दिवाळीच्या तोंडावर शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे काही ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडून होती.
Gokul Election Dates
Gokul Election Dates sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची आणि राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी सहकारी संस्था म्हणून गोकुळ दूध संघाकडे बघितले जाते. परंतु यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला धक्का देत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या घडामोडी घडल्या. सत्ता आपल्याकडे राखण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू असताना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. गोकुळ दुध संघावर शासन नियुक्त चार संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.

यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनीही या निर्णयाचा निषेध करत महायुती सरकारवर टीका केली. दुष्काळाच्या गंभीर पार्श्वभूमीवर दिवाळीच्या तोंडावर शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे काही ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडून होती.

मात्र, ही बैठक जनतेच्या प्रश्नांपेक्षा गोकुळ दूध संघावर मागच्या दाराने सत्ता कशी मिळवायची, यासाठीच असल्याचे दिसून आले, अशा शब्दात पाटील यांनी महायुती सरकारवर लोकशाही मुल्यांची पायमल्ली केल्याचा आरोप केला. गोकुळ दूध संघावर शासननियुक्त ४ संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय अत्यंत निषेधार्ह असून, सहकार क्षेत्रातील लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारा आहे.

साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा अवलंब करूनही सत्ता हस्तगत करता आली नाही, म्हणून आता घटनात्मक प्रक्रियेचा आधार घेत मागच्या दाराने सत्ता मिळवण्याचा हा महायुतीचा रडीचा डाव आहे. स्वतः सत्तेत असताना 'लोकशाही वाचवा'चा आव आणत मोर्चे काढायचे आणि सत्तेचा हव्यास पूर्ण करण्यासाठी दुसरीकडे त्याच लोकशाहीचा गळा घोटायचा, हा दुटप्पीपणा कसा चालेल? असा सवाल करत जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवून सत्तेच्या राजकारणासाठी सहकार क्षेत्रातील लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या निर्णयाचा जाहीर निषेध कैलास पाटील यांनी समाज माध्यमातून केला.

काय घडले होते गोकुळमध्ये?

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी झाली. १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला. २५ संचालकांच्या या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या. तर महायुती समर्थक पॅनलला १२ जागांवर विजय मिळाला. समविचारी आघाडीकडे बहुमत असताना अध्यक्ष पद आणि सत्तेसाठी गेल्या काही दिवसात राज्य पातळीवर मोठ्या घडामोडी घडत होत्या.

२९ ऑक्टोबरला अध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. गोकुळच्या उपविधीनुसार या बैठकीसाठी १४ संचालकांची गणपूर्ती (कोरम) आवश्यक होता. सतेज पाटील (Satej Patil) गटाचे १३ संचालक बैठकीला उपस्थित होते. तर महायुतीचे सर्व बारा संचालक अनुपस्थित राहिले. त्यामुळे १४ संचालकांची उपस्थिती पूर्ण झाली नाही.परिणामी अध्यक्ष निवडीची बैठक तहकूब करण्यात आली. यानंतर सतेज पाटील गटाच्या १३ संचालकांनी स्वतंत्र बैठक घेऊन शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. मात्र संघाच्या प्रशासनाने या निवडीला अधिकृत मान्यता दिली नाही.

सतेज पाटील गटाने या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली. २ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुन्हा घेण्याचे निर्देश दिले. सर्व २५ संचालकांना नियमानुसार नोटीस देण्यासही सांगितले. तत्तपुर्वीच आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३AAA (२) च्या तरतुदीत सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.त्यानूसार सरकारने चार मतदानाधिकार असलेले तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्याचा मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.