

Shivsena News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर महाराष्ट्र हादरला होता. सगळ्या प्रकारची काळजी घेतल्यानंतरही हा अपघात झालाच कसा? याबद्दल अजूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशातच राज्यातील जनतेच्या उरात धडकी भरवणारे प्रसंग, घटना समोर येत आहेत.
मंत्री पकंजा मुंडे यांच्या हेलीकाॅप्टरमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे त्याचे उड्डाण ऐनवेळी रद्द करावे लागले होते. याची चर्चा थांबत नाही तोच आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या लातूर येथून नियोजित विमानाचे उड्डाण रद्द करावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. क्लिअरन्स न मिळणे आणि तांत्रिक बिघाडामुळे हे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे सांगितले जाते.
राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने राजकीय पक्षांच्या नेत्याचे दौरे वाढले आहेत. कमी वेळात अधिक ठिकाणी पोचण्यासाठी खाजगी कंपन्याचे हेलीकाॅप्टर, छोट्या विमानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. गुलाबराव पाटील आज लातूर दौऱ्यावर असताना त्यांचे परतीचे हवाई उड्डाण अचानक रद्द करण्यात आले.
हवाई यंत्रणांकडून क्लिअरन्स न मिळाल्यामुळे पाटील यांचे लातूर येथून होणारे हवाई उड्डाण रद्द करण्यात आले. एका खाजगी कंपनीचे सहा आसन क्षमतेचे विमान लातूर विमानतळावरून नियोजित वेळेनूसार साडेचार वाजता उड्डाण करणार होते. हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथून आवश्यक क्लिअरन्सची प्रतीक्षा पाच वाजेपर्यंत करण्यात आली. मात्र, ठराविक वेळेत क्लिअरन्स न आल्याने पायलटने उड्डाणास असमर्थता दाखवली.
तसेच संध्याकाळी लातूर येथून विमान उड्डाणास मर्यादा असल्याने हे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गुलाबराव पाटील यांना कारने प्रवास करावा लागला. लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. रेणापूर तालूक्यातील कामखेडा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी ते जळगावहुन विमानाने लातूर विमानतळावर आले होते. सभा आटोपल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता ते पून्हा जळगावकडे जाणार होते.
त्यानूसार त्यांचे सायंकाळी लातूर विमानतळावर आगमन झाले. ते विमानात बसल्यानंतर सुरवातीला धावपट्टीवर एक फेरी घेऊन विमान टर्मिनन्स इमारतीकडे परत आले. क्लिअरन्स मिळत नसल्याचे पायलटकडून सांगण्यात आले. पण, पुढील फेरी घेऊन विमानात इंडिकेटरशी संबंधीत काही तांत्रिक बिघाड झाला होता, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी सांगितले. विमान रद्द झाल्याने पाटील हे लातूरमधून वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाल्याचेही ते म्हणाले.
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. तेव्हापासून राजकीय नेत्यांमध्ये हवाई उड्डाणासंदर्भात काहीसे भितीचे वातावरण आहे. पंकजा मुंडे यांनी तरी आपल्या हेलिकाॅप्टर, विमान प्रवासाच्यावेळी आई देव पाण्यात ठेवून काळजी करत असते, असे म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.