

Latur ZP Election News : लातूर जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. पण महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या सुमार कामगिरीमुळे सत्तेत जाण्याचे स्वप्न मात्र भंगले. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेत सत्ता, अध्यक्षपद मिळवले. तर राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले.
लातूर जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सोमवारी (ता.31 मार्च) काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माघार घेतली. त्यामुळे चारही सभापती हे भाजपा-राष्ट्रवादीचे बिनविरोध झाले. प्रत्येकी दोन-दोन सभापती पदं या पक्षांच्या वाट्याला आले. काँग्रेस पक्षाने नेमकी माघार का घेतली? यावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी वेगळाच दावा केला आहे. निवडणुक संपली आता विकास झाला पाहिजे, म्हणून आमच्या उमेदवाराने माघार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुका झाल्या की राजकारण संपले पाहिजे आणि विकासाचे राजकारण सुरू झाले पाहिजे, हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून लातूर जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत काँग्रेस पक्षाने विधायक पाऊल उचलले आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण हितासाठी आणि प्रशासकीय कामात समन्वय राहावा, या उद्देशाने काँग्रेसने सभापतिपदासाठी दाखल केलेले आपले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतला.
जिल्हा परिषदेच्या चार प्रमुख विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया सोमवारी पार पडली. यामध्ये काँग्रेसच्या वतीने समाजकल्याण सभापती पदासाठी मुकेश भालेराव, विशेष समिती क्रमांक 1 साठी तानाजी जाधव, विशेष समिती क्रमांक दोनसाठी दत्ता टेंकाळे आणि महिला व बाल कल्याण समितीसाठी योगिता जाधव यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
सुरुवातीला ही निवडणूक चुरशीची होईल असे चित्र असतानाच, काँग्रेसने अनपेक्षितपणे आपले सर्व अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी विकासकामासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
आमचे नेते दिलीपराव देशमुख यांनी लातूर जिल्हा परिषदेला नेहमीच एक सकारात्मक शिस्त आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची परंपरा दिली आहे. याच परंपरेचा वारसा जपत आमदार अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार धीरज देशमुख यांनी सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा केली.
राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित असावे आणि एकदा निवडून आल्यावर अठरा पगड जाती-धर्माच्या लोकांच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, हा आमचा विचार आहे. म्हणूनच वादविवाद टाळून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही आमचे अर्ज मागे घेतले. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे सभापतिपदाच्या निवडी बिनविरोध होण्यास मदत झाल्याचेही साळुंके यांनी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.