Majalgaon Dam : बीडमध्ये राष्ट्रवादीसोबतच्या वादात भाजपची सरशी : आमदार सोळंके आग्रही असलेल्या प्रकल्पाला विखे पाटलांची स्थगिती

Majalgaon Dam : माजलगाव धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांच्या विरोधानंतर तूर्त स्थगिती देण्यात आली. फेरसर्वेक्षणानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असून २२ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Majalgaon Dam height
Majalgaon Dam height Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाची उंची वाढवण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय अखेर शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर स्थगित करावा लागला आहे. धरणाची उंची वाढवण्याच्या मुद्द्यावरून माजलगाव तालुक्यात राजकीय वातावरणही तापले होते.

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला. माजलगाव धरणाची उंची वाढवताना या भागातील 22 गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असल्याचा दावा करत युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून सरकारच्या या निर्णयाला गेल्या काही दिवसापासून विरोध सुरू होता.

दुसरीकडे माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी मात्र धरणाची उंची वाढवताना शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत नाहीत, असा दावा केला होता. कामांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या तर आपण स्वतः शेतकऱ्यांसोबत आंदोलनात उतरू अशी भूमिका जाहीर केली होती.

त्यामुळे राज्यातील महायुती सरकारचाच भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका धरणाची उंची वाढवण्यात यावी, अशी आहे. तर भाजपचा मात्र या निर्णयाला विरोध असल्याचे दिसून आले. दरम्यान भाजपचे ओमप्रकाश शेटे यांनी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांना सोबत घेत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत माजलगाव धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली होती.

Majalgaon Dam height
Maharashtra Political Live Update : कृत्रिम पावसाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरचा : जयकुमार गोरे

या भेटीनंतर लगेचच आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत माजलगाव धरणाची उंची वाढवताना शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होत नसल्याचा दावा करत भाजपच्या भूमिकेला विरोध केला होता. दरम्यान युवा शेतकरी संघर्ष समितीने धरणाची उंची वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात जलसमाधी आंदोलन करत वातावरण अधिकच तापवले होते.

या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी या विषयात त्यांनी मध्यस्थी करावी अशी गळ घातली होती. पंकजा मुंडे यांच्या पुढाकारानंतर माजलगाव धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय अखेर सरकारने स्थगित केला आहे.

Majalgaon Dam height
Maharashtra Political Live Update : मराठवाड्याची कन्या म्हणून दादांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करताना अत्यंत अभिमान आणि आनंद : सुनेत्रा पवार

याबाबत फेर सर्वेक्षण करून नंतरच निर्णय घेतला जाईल असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय स्थगित केल्यानंतर युवा शेतकरी संघर्ष समितीने पंकजा मुंडे व राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com