Maratha Reservation News : गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या अंतरवाली सराटीतील मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. साष्टीपिंपळगाव गावातून सर्वात प्रथम मराठा आरक्षणाच्या मागणीचे रणशिंग मनोज जरांगे पाटील यांनी फुंकले होते. त्यानंतर तीन वर्षापूर्वी अंतरवाली सराटी येथून सुरू केलेल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीचा लढा व त्याची धग थेट दिल्लीपर्यंत पोहचली.
जेमतेम दोन-अडीच हजार लोकसंख्येचे हे गाव जगभरात पोहचले. गेल्या तीन वर्षात राज्यातील, देशातील प्रमुख राजकीय नेत्यांचे पाय या गावाला लागले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील मराठा आरक्षणाची धग सहन करावी लागली. अंतरवाली सराटीत पेटलेला मराठा आरक्षणाचा हा वणवा पुढे मुंबईतही पोहचला. या संघर्षातून मराठा समाजाच्या पदरात बरचं काही पडलं.
परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या दृष्टीने हा लढा अजूनही संपलेला नाही. आंदोलना दरम्यान, अंतरवाली सराटीत झालेला आंदोलकांवरील लाठीमार, गोळीबार त्यांचे पडसाद म्हणून राज्यभरात झालेला रास्ता रोको, जाळपोळ, बंद याच्या झळा सरकरार आणि सर्वसामान्यांनाही बसला. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानीपत झाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात अनेक तरूणांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.
पोलीसांनी जाळपोळ, हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. या सगळ्या तीन वर्षाच्या प्रवासात अंतरवाली सराटी गाव होरपळत राहिले, असे देखील बोलले जात आहे. अंतरवाली सराटीत आंदोलन नको, अशी भूमिका घेत काही गावकऱ्यांनी ग्रामसभेचा ठराव देखील घेतला होता. पण पुढे आंदोलनाला परवानगी देत गावकरीच यात सहभागी झाले. आता पून्हा सतत होणारे आंदोलन, होणारी गर्दी यामुळे मुला-मुलींचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा सूर गावातील काही मंडळींनी लावल्याची चर्चा आहे.
यातून पुन्हा एकदा ग्रामसभेत ठराव घेऊन यापुढे अंतरवालीत आंदोलन नको, अशी भूमिका पुढे आली, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटीच्या सरपंचांना आदेश देत त्यांनी गावातील उपोषणाचा मंडप काढण्यास सांगितले आहे.
यावर खुलासा करताना आपण यापुर्वीच हे अंतरवालीतील शेवटचे निर्णायक आंदोलन असेल असे जाहीर केले होते. त्यानूसारच आपण गावातील मंडप काढण्यास सांगीतल्याचे स्पष्ट केले. ग्रामसभेचा ठराव किंवा गावकऱ्यांचा विरोध हे यामागचे कारण नाही. यापुर्वी देखील अशा प्रकारचा विरोध आणि ग्रामसभेत आंदोलनाच्या विरोध ठराव झाला होता. पण तरी देखील अंतरवालीत आंदोलन, उपोषण झालेच होते, याची आठवण जरांगे पाटील यांनी करून दिली.
आता पाटोद्याहूनच मुंबईकडे कूच..
२९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या उपोषणाच्या १९ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे जातांना पाटोदा येथे प्रकृती बिघडली. दुसऱ्या दिवशी पहाटेच सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, सुरेश धस यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला तीन महिने देण्याचा निर्णय घेत उपोषण स्थगित केले.
त्या दिवसापासून जरांगे पाटील हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज त्यांनी सरकारला दिलेली मुदत संपली आणि काही निर्णय झाला तर आपण पाटोद्यातूनच मुंबईच्या दिशेने कूच करणार आहोत. आता परत माघारी फिरणार नाही. अंतरवाली सराटीतील आंदोलन शेवटचे होते मी आधीच जाहीर केले होते. यानंतर आंदोलन राज्याच्या कुठल्याही भागात होऊ शकते. मुंबई, पश्चिम महाराष्ट्रासह कोणत्याही भागात आंदोलन केले जाईल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
असा होता आंदोलनाचा घटनाक्रम
- २९ ऑगस्ट २०२३ रोजी अंतरवाली सराटीत पहिले आमरण उपोषण.
- १ सप्टेंबर २०२३ रोजी आंदोलनकर्त्यांवर पोलिस लाठीचार्ज आणि आंदोलन राज्यव्यापी बनले.
-१४ सप्टेंबर २०२३ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर पहिले उपोषण स्थगित.
- जानेवारी २०२४ अंतरवाली ते मुंबई महामोर्चा काढण्यात आला. सगेसोयरे यांच्यासह सरसकट आरक्षणाची मागणी करण्यात आली.
- २० फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्रात स्वतंत्र १० टक्के मराठा आरक्षणाचा कायदा.
- २०२५ मध्ये मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन आणि हैदराबाद गॅझेटियरचा मुद्दा.
-२०२६ मध्ये ५८ लाख कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला.
- १७ सप्टेंबर २०२६ रोजी २० दिवसांच्या उपोषणानंतर ९० दिवसांची सरकारला मुदत आणि उपोषण स्थगित, पण आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका जाहीर करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.