Latur News : औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दिवाळी पाडव्याच्या पूर्वसंध्येला मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबर रोजी किल्लारी कारखाना गळीत हंगाम सुरू होत आहे. या कार्यक्रमाला मराठा समाजाकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता आमदार पवारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.
हा कार्यक्रम शेतकरी हिताचा व बहुतांश मराठा समाजाच्या जीवनाशी निगडित असल्याने याला विरोध करू नये. यावर जरांगे पाटलांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाला विरोध होणार नाही, असे आश्वासन दिले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत लोकप्रतिनिधींना गावबंदी आणि कुठलाही कार्यक्रम होऊ न देणे ह्या प्रमुख गोष्टी मराठा समाजाच्या अजेंड्यावर आहेत.
किल्लारी साखर कारखाना हा गेली पंधरा वर्षे बंद अवस्थेत होता. त्यावर ९५ कोटींचे कर्ज होते. गेल्या वर्षी थोडी साखर काढून यंदा पुन्हा हा कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे. कारखान्याचे गाळप फडणवीसांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र फडणवीसांच्या या दौऱ्याला मराठा समाजाकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पवारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. गोरगरीब शेतकरी ज्यामध्ये बहुतांश मराठा आहेत. त्यांच्यासाठी काम करत असल्याचे पवार यांनी जारांगे पाटील यांना सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"आमदार पवार करीत असलेल्या कामाबद्दल मी ऐकून आहे. बीडमध्ये झालेल्या प्रकारात नाहक गोरगरीब मराठा समाजातील लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांचा छळ केला जात आहे. तो बंद करण्याचे सरकारला सांगा. आपण शेतकरी आणि विशेष करून गोरगरीब मराठा शेतकरी यांच्यासाठी करीत असलेले काम मी ऐकून आहे. तुमच्या कार्यक्रमात कोणीही बाधा आणणार नाही. मी स्वतः या बद्दल मराठा समाजातील लोकांशी बोलेन. तुमच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत", अशा शब्दात मनोज जरांगे पाटलांनी आमदार पवार यांना आश्वासन दिले.
कोणालाही जास्तवेळ न देणाऱ्या जरांगे पाटलांनी आमदार पवारांसोबत तब्बल ४५ मिनिटे चर्चा केली. यामध्ये पवारांनी देवेंद्र फडणवीस मराठा समाजासाठी करीत असलेल्या कार्याचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडला. जारांगेनी तो शांतपणे ऐकून घेतला आणि आमदार पवारांना त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कदाचित पुढील वाटाघाटीत फडणवीसांच्या मर्जीतील आमदार पवार मराठा समाज आणि सरकार यामधील महत्त्वाचा दुवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.