

Beed Land Scam: एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या ऑपरेशन टायगरनंतर शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना या पक्षांतराचे अखेर बक्षीस मिळाले आहे. विरोधी पक्षात असल्यामुळे आपल्याला विकास कामे करता येत नाही, कार्यकर्त्यांचाही आग्रह सत्तेत चला असा आहे, असा दावा करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांना सरकारकडून ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यापैकी २० कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. या निधीतून आता जिल्ह्यातील रखडलेली विकास कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य बाळगून आहेत. मागील वर्षभरापासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. यामध्ये पक्ष सोडून शिवसेनेत दाखल झालेल्या मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, आणि धाराशिव जिल्ह्याच्या खासदारांनी असे कुठलेही ऑपरेशन नाही, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार, असे स्पष्टीकरण दिले होते. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी तर ऑपरेशन टायगर काही नाही ते सगळं फेल आहे, असा दावा केला होता. मात्र या चर्चेमागे काहीतरी शिजतंय याचा अंदाज त्यावेळी आला होता.
अखेर मराठवाड्यातील तीन आणि उर्वरित महाराष्ट्रातील तीन असे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे शिकार झाले. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम राजेनिंबाळकर यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाल्यानंतर या तीनही खासदारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या मुंबईत भेटी घेतल्या होत्या.
मतदार संघातील रखडलेली विकास कामे आणि त्यासाठी आवश्यक असलेला निधी याची यादीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवली होती. निधीचा शब्द दिल्यानंतर एकनाथ शिंदे हे सहा खासदारांना घेऊन दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही भेटले होते.
या भेटीनंतरच परभणी जिल्ह्यातील विकास कामांसाठी ११० कोटी रुपयांच्या निधीला राज्यातील महायुती सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी २० कोटी रुपयांचा निधी वितरित देखील करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील नटराज रंगमंदिर पुनरुज्जीवन, महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, शहरासाठीची समांतर पाणीपुरवठा योजना याशिवाय भूमिगत गटार योजना अशा विविध विकास कामांना मंजुरी व काही कामांसाठी निधी देण्यात आला आहे.
परभणी शहराच्या समांतर पाणीपुरवठा योजनेचा अडीचशे कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी अभावी रखडला होता, त्यालाही आता मान्यता देण्यात आली आहे. भूमिगत गटार योजनेचा ५७४ कोटी रुपयांच्या प्रस्तावालाही लवकरच मंजुरी मिळेल असे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.