Chhatrapati Sambhajinagar : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चार महिन्यात घ्या, असे निर्देश दिले. त्यानंतर राज्य सरकारनेही निवडणुका घेण्याची तयारी दर्शवली. छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात गेल्या पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झालेल्या नाहीत. मात्र ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला प्रश्न आणि निवडणुकीचा मार्ग निकाली निघाल्याने निवडणुकीची लगबग आता सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समितीच्या निवडणुका आता होणार आहेत. महापालिकेत दहा वर्षानंतर नगरसेवक आणि जिल्हा परिषदेत सदस्य निवडण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. संभाजीनगरात पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक, रस्ते आणि वाहनतळ या प्रमुख मुद्द्याभोवती निवडणूक लढली जाणार आहे. गेल्या महापालिकेचा विचार केला असता तिथे शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. आजच्या घडीला महायुती स्ट्राॅंग वाटत असली तरी उद्धवसेनाही धक्का देऊ शकते, असे बोलले जाते.
2015 मध्ये 113 वार्डांमधून शिवसेनेचे 28, भाजपचे 22 नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेसचे 10, एमआयएम 27 व इतरांचा आकडा 26 होता. (Mahayuti) शिवसेना-भाजप युती आणि एमआयएम विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहिला. 2015 नंतर 2020 मध्ये निवडणुका अपेक्षित होत्या, मात्र कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाही. या पाच वर्षांमध्ये महापालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासकांनी पाहिला. दोन हजारावर ठरावांना मंजुरी देत विकास कामे सुरू होती.
यामध्ये काही वादग्रस्त विषय आणि प्रशासकांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे गालबोट या प्रशासकराज काळात लागले. गेल्या पाच वर्षापासून महापालिका निवडणुकीची वाट पाहणाऱ्या इच्छुक आणि भावी नगरसेवकांमध्ये आता उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते, राजकीय पुढारी आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात संभाजीनगरच्या जनतेमध्ये मोठा रोष आहे. हा रोष आता महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त होईल.
संभाजीनगरकर कोणाच्या बाजूने कौल देतात? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीचाच बोलबाला राहिला. महाविकास आघाडी या दोन्ही निवडणुकीत भुईसपाट झाली. अर्थातच या विजयाचा प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही दिसू शकतो. मात्र पेटलेल्या पाणी प्रश्नाचे चटके कोणत्या पक्षाला बसतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यामुळे शिंदे यांची शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यानिमित्ताने आमने-सामने येणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच शहरातील पाण्याचा प्रश्न हाती घेत सत्ताधाऱ्यांविरोधात जन आंदोलन उभारले आहे. येत्या 16 मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शहरात भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन पक्षाकडून सुरू आहे. तर महिनाभरापासून 'लबाडांनो पाणी द्या' या घोषवाक्यखाली शिवसेनेने संभाजीनगरात विविध कार्यक्रम घेत सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पाणी प्रश्ना संदर्भात जन आंदोलन करत असताना या पक्षालाही टीकेचे धनी व्हावे लागत आहे. कारण महापालिकेच्या 25 वर्षाच्या सत्तेत शिवसेना हा प्रमुख पक्ष होता. त्यामुळे संभाजीनगरकरांचे पाण्यासाठी जे हाल सुरू आहेत, त्याला शिवसेना देखील तितकीच जबाबदार असल्याचा सूर सर्वसामान्यांमधून निघतो आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या विरोधात उद्धव ठाकरेंची सेना कशी लढणार? हा खरा प्रश्न आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे शहरात संघटनात्मक बळ नसल्याने महायुती विरोधात एकट्या उद्धवसेनेलाच किल्ला लढवावा लागणार आहे.
तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांमध्ये वाढ झाली असली तरी पराभूत झालेल्या एमआयएमसाठी महापालिका निवडणुकीत मोठी संधी असणार आहे. पाच वर्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या एमआयएमचे 27 नगरसेवक होते. त्यात इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम किती भर टाकणार? यावर महापालिकेतील सत्तेचे गणित अवलंबून असणार आहे. सत्तेच्या चाव्या एमआयएमच्या हाती असतील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एमआयएमची वाढती जवळीक भविष्यात नव्या समीकरणाची नांदी तर नाही ना? अशी कुजबूज देखील सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.