Lok Sabha Election 2024 : गेली चार दशके राज्य व देशपातळीवर काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करत असलेले, पक्षावर व गांधी घराण्यावर निष्ठा ठेवत संकटकाळात सबुरीने काम करणारे नेते म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोकराव शंकरराव चव्हाण. काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा ते गेली चार दशके सक्षमपणे चालवत आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. (Latest Marathi News)
माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांना राजकारणातील हेडमास्तर समजले जायचे. पक्षाची शिस्त, वेळेला महत्त्व देणे, विकासाभिमुख द़ष्टी ठेवून धोरणे आखून त्याची अंमलबजावणी करणे, नियोजन आदी विचारांची शिदोरी अशोक चव्हाणांना वडील शंकरराव चव्हाण यांच्याकडून मिळाली.
पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना मॅनेजमेंट गुरू म्हणूनही ओळखले जाते. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेली सहा दशके चव्हाण घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. महाराष्ट्रातीत राजकीय इतिहासात पिता-पुत्र मुख्यमंत्री होण्याचा मान चव्हाण घराण्याकडे जातो. दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री झाले. अशोक चव्हाण यांनीही दोन वेळा राज्याचे नेतृत्व केले. त्यांनी राज्यातील मंत्रिमंडळात विविध विभागांचे कॅबिनेट व राज्यमंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली.
अशोकराव शंकरराव चव्हाण
28 आक्टोबर 1958
Bsc, MBA
माजी मुख्यमंत्री अशोक यांना समृद्ध असा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांची राजकीय जडणघडण वडिलांच्या संस्कारांत झाली. चव्हाण कुटुंबीय हे मूळचे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील आहे. कै. शंकरराव चव्हाण हे शिक्षण व कामानिमित्ताने नांदेड येथे आले व स्थायिक झाले. कै. शंकरराव चव्हाण हे दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री बनले. केंद्रातही अनेक महत्त्वांच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. राज्यातील महत्वाच्या सिंचन प्रकल्पांची उभारणी त्यांच्या काळात झाली आहे. त्यांना आधुनिक भगीरथ म्हणून ओळखले जाते.
अशोक चव्हाण यांच्या मातोश्री कै. कुसुमावती चव्हाण ह्या गृहिणी होत्या. त्यांना पाच बहिणी आहेत. त्यांच्या पत्नी सौ अमिता चव्हाण या राजकारणात सक्रिय असून त्या भोकर विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये निवडून आल्या होत्या. त्यांना सुजया व श्रीजया या जुळ्या कन्या आहेत. सुजया चव्हाण या गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अशोक चव्हाण सेवा सेतूचे काम त्या सांभाळतात. श्रीजया चव्हाण यांचे शिक्षण सुरू आहे. त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शेती व उद्योग.
नांदेड
काँग्रेस
अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झाली. पुणे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून ते निवडून आले होते. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते मुख्य प्रवाहातील राजकारणात सक्रिय झाले. 1986 ते 1989 या काळात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी विविध आंदोलने केली, अभियान राबवले. त्यांनी पहिली लोकसभा निवडणुक 1987 मध्ये लढविली. या पोटनिवडणुकीत त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. ते वयाच्या तिसाव्या वर्षात खासदार झाले. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. जनता दलाचे नवखे उमेदवार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवाची चर्चा राज्यभर झाली होती.
यानंतर चव्हाण यांची 1992 मध्ये विधान परिषदेवर निवड झाली. ते पहिल्यांदा 1993 मध्ये राज्यमंत्री झाले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्यावर 1995 ते 1999 या काळात ते काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस होते. विधानसभेची पहिली निवडणूक 1999 मध्ये मुदखेड मतदारसंघातून लढविली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले व महसूलमंत्री झाले. त्यांनतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला होता. त्यांना परिवहन, बंदरे, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार विभागाचे मंत्रिपद देण्यात आले होते. ते पुन्हा 2004 मध्ये मुदखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. व राज्य सरकारच्या उद्योग, खणिकर्म, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार विभागाचे मंत्री झाले.
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मुंबईत अतिरेक्यांनी हल्ला कला होता. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने 2008 मध्ये अशोक चव्हाणांवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी टाकली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला बहुमत मिळाले. ते भोकर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झाले व दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही ते निवडून आले होते.
पक्षाने त्यांच्यावर 2015 मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. ते 2019 मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले व उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झाले. ते पाच वेळा आमदार व दोन वेळा खासदार झाले आहेत. सध्या देशपातळीवर काँग्रेस वर्किंग कमिटीचे ते सदस्य आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात शेती, उद्योग सिंचन आदी विकासाला चालना मिळाली. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष असून, हा कारखाना त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 27 वर्षांपासून सुरू आहे.
पक्षाने त्यांच्यावर वेळोवेळी जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. गुजरात, आसाम, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसने त्यांना नियुक्त केले होते. उदयपूर, रायपूर येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राजकीय ठरावाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा करण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. मुंबईत झालेल्या इंडिया बैठकीसाठी काँग्रेसचे समन्वयक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांना विशेष निरीक्षक नेमले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाची देशभर चर्चा झाली होती. त्यांनी नांदेड जिल्ह्यात केलेली तयारी नांदेड पॅटर्न म्हणून यात्रेच्या पुढील टप्प्यात अंमलात आणला गेला.मुख्यमंत्री असताना आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी पक्षाने त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यांनी राजीनामा दिला व पक्षाचे काम निष्ठेने सुरू ठेवले होते. पक्षाने 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते.
चव्हाणांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. गुरु ता गद्दी सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाल्याने शहराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. त्यांच्या मुख्यमंत्री व मंत्रिपदाचा काळात राज्यातील विविध विकासकामांना गती मिळाली. नवे विन प्रकल्प, उद्योग, सिंचन प्रकल्पां बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आहेत. नांदेड ते जालना रस्ता समृद्धी महामार्गला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणात सक्रिय झालेल्या अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते पाच वेळा आमदार व दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खचून न जाता सहा महिने अथक परिश्रम करून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघात ९५ हजारांवर मताधिक्याने ते निवडून आले.
अशोक चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करुन सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना आधार देण्याचे काम करण्यात आले आहे.
आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. नांदेड येथे दरवर्षी संगीत शंकर दरबाराचे आयोजन करण्यात येते. यात देशभरातील कलावंतांनी सादरीकरण केले आहे. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दैनिक सत्यप्रभाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. ते धार्मिक वृत्तीचे असल्याने गणेशोत्सव व दुर्गा महोत्सवात सहभागी होतात. नांदेड शहरातील शिवाजी नगरातील निवासस्थान परिसरात या उत्सवाचे आयोजन करण्यात येते.
अशोक चव्हाणांनी 2019 ची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
महाराष्ट्रात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन जागा निवडून आल्या होत्या. त्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघातून दिवंगत नेते राजीव सातव हे निवडून आले होते तर नांदेड लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे निवडून आले आहेत. ही जागा काँग्रेसला 2019 मध्ये राखता आली नाही.
2019 मध्ये झालेल्या नांदेड लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची व अतितटीची झाली. या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. अशोक चव्हाण हे विद्यमान खासदार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. प्रतिस्पर्धी उमेदवार होते भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव पाटील चिखलीकर. या निवडणुकीत अशोक चव्हाणांचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवाचा प्रमुख कारणात मतविभागणीचा समावेश होतो. या निवडणूकीत काँग्रेसच्या हाक्काची मते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांना मिळाली. भिंगे यांनी तब्बल एक लाख साठ हजारांच्यावर मते घेतली. अशोक चव्हाणांचा 41 हजारा मतांनी पराभव झाला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. याचा फटका अशोक चव्हाणांना बसला. देगलूर, बिलोली, मुखेड या भागात प्रतापराव पाटील चिखलीकरांना मताधिक्क्य मिळाले होते. नायगाव, धर्माबाद, उमरी या भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी चिखलीकरांना मताधिक्य मिळवून दिले.
देशभरातील मोदी लाटेचा फायदा चिखलीकरांना झाला. त्यांच्या भोवती असणाऱ्या ठराविक पदाधिकाऱ्यांचा घोळका व त्यांनाच मिळणारा सत्तेचा लाभ यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी दुर्लक्षित होत गेले. एकदा बदल करायचा, अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आणि त्याचा फटका त्यांना बसला होता. स्थानिक पदाधिकारी बेफिकीर होते. साहेब निवडून येणार हा त्यांचा फाजील आत्मविश्वास नडला.
अशोक चव्हाण हे नागरिक व पदाधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असतात. मतदरांच्या अडीअडचणी समजून घेणे, त्याचा पाठपुरावा करणे याकडे लक्ष देतात. नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी मदत व्हावी यासाठी अशोक चव्हाण सेवा सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागरिक आपल्या समस्या फोनवर संपर्क साधून कळवतात. त्या सोडवण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड येथे संपर्क कार्यालय आहे.
मतदासंघातील गावांना नियमितपणे भेटी देऊन समस्या समजून घेतल्या जातात.च सार्वजनिक समारंभ, विवाह सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहतात. लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन धीर देण्याचे काम केले जाते. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बांधावर जाऊन आधार देण्यात येतो. मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिकांशी थेट संवाद साधला जातो.
बदलत्या काळानुसार, अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. या कामासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यांचे फेसबुक, एक्स यावर नियमित संदेश टाकण्यात येतात. एक्सवर त्यांचे सुमारे चार लाखांच्या घरात फॉलोअर्स आहेत. पक्षाची ध्येयधोरणे, विविध कामांची माहिती देण्यात येते. त्यांनी केलेले विधाने , विविध राजकीय घडामोडींवर मांडलेली मते, पक्षाचे ध्येय धोरणे या विषयावर माहिती टाकण्यात येते. ही माहिती स्थानिक पातळीवरील पदाधिकारी सोशल मीडियावर टाकत असतात.
अशोक चव्हाण हे शांत व संयमी नेते म्हणून परिचित आहेत. वादग्रस्त व भडक विधाने करण्याचे कटाक्षाने टाळतात.
वडील, माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण
पक्षनिष्ठा हा अशोक चव्हाणांची जमेची बाजू आहे. गांधी घराण्याशी ते एकनिष्ठ राहिले आहेत. त्यांना पक्षाने आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला होता. यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले होते. पण अशोक चव्हाणांनी संयम कायम ठेवला व पक्षाचे काम निष्ठेने केले. त्यांना पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली. ते विजयी झाले. पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ते काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत. विकासकामांची जाण असलेले नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. जास्तीत जास्त योजना व विकासनिधी आणण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे.सर्वपक्षीय नेत्यांची मैत्रीपूर्ण संबंध आहेत.तसेच माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे स्वगृही परत आले आहेत.ही एक जमेची बाजू मानली जात आहे.
अशोक चव्हाण यांच्या सोबत बडव्यांचा राबता असतो याचा फटका सर्वसामान्य कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना बसतो. यामुळे काही ज्येष्ठ पदाधिकारी त्यांच्या पासून दूर जात आहेत. तसेच काही ठराविक पदाधिकाऱ्यांनाच सत्तेचा लाभ मिळाला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले जात नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
नांदेड लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला सुटणार हे निश्चित आहे. या जागेवर कोण निवडणूक लढविणार हे अशोक चव्हाण ठरवणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.