

Beed Politics : नगर पालिका निवडणुकीत नेतृत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीला उमेदवार निवडीवरुन वाटाघाटीत रस्सीखेच आणि हे प्रकरण तुटण्यापर्यंत ताणल्याने या पक्षाच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झाली नाही. प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षाकडून (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार यादी जाहीर होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही 'अस्ते कदम चाल' खेळत इच्छुकांना वाट पहायला भाग पाडले आहे. बीडच्या राष्ट्रवादीची सुत्रे आता पंडितांच्या हाती आली आहेत.
मागच्या नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, संदिप क्षीरसागर यांची काकू नाना विकास आघाडी आणि एमआयएम अशी तिरंगी लढत झाली. नगराध्यक्षपदी डॉ. भारतभूषण क्षीरसागर विजयी झाले तर पक्षाने 21 जागा जिंकल्या. तर, संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीनेही 18 जागांसह उपनगराध्यक्षपद मिळविले.
त्यानंतर शहरातील राजकारणात बिंदुसरा नदीतून भरपूर पाणी वाहून गेले आणि राजकीय समिकरणे बदलली. मात्र, बीडचे राजकारण क्षीरसागरांभोवतीच फिरत राहीले. मात्र, या ओढाताणीनंतर बीडची सुत्रे पंडितांकडे आली आहेत. दरम्यान, त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले. तर, संदीप क्षीरसागर दोनदा आमदार झाले. डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही स्विकृत नगरसेवक म्हणून राजकीय प्रवास सुरु करत पुढे वडिलांचा राजकीय वारसा हाती घेत काका जयदत्त क्षीरसागरांपासून दुर होत राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्षपद आणि मागची विधानसभा उमेदवारीही मिळविली. परंतु, कायम क्षीरसागरांना मानणारा माजी नगरसेवकांचा एक मोठा गट त्यांच्यापासून दुरावला.
आता होत असलेल्या निवडणुकीत याच माजी नगरसेवकांच्या उमेदवारीवरुन डॉ. क्षीरसागर आणि पक्षात ओढाताण सुरु झाली. अखेरकार शनिवारी डॉ. क्षीरसागर यांनी पक्षाच्या पदाचाही राजीनामा दिला. तत्पुर्वीच बीडची सुत्रे हाती आल्यानंतर पंडितांच्या शिवछत्र निवासस्थानी उमेदवार यादीसाठी तीन दिवसांपासून खलबते सुरु झाली. आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, बळीराम गवते आदी उमेदवार निवडत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यास उशिर लागला.
प्रमुख प्रतिस्पर्धर्यांचे उमेदवार जाहीर होत नसल्याने राजकीय खेळी म्हणून आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनीही तयार करुन ठेवलेली उमेदवार यादी घोषित केली नाही. मागच्या वेळी आघाडीतून यश आणि दोन्ही आमदारकीवेळी प्रतिस्पर्धयापेक्षा शहरातून अधिक मते मिळाल्याने यावेळी त्यांनाही 'फुल्ल कॉन्फीडन्स' आहे. त्यात आता त्यांच्याकडे प्रमुख नेत्यांचे प्रवेश देखील होत आहेत. मात्र, अगोदर समोरचे कोणते अस्त्र काढतात हे पाहूनच उमेदवारीची त्यांची खेळी आहे.
तगड्या उमेदवारांची यादी तयार असून लवकरच जाहीर घोषणा करु. आम्ही म्हणजेच पक्ष असे म्हणून काही लोकांनी पक्षाला वेठीस धरले. आतापर्यंत जिल्ह्याचे शहर बकाल केले. पालकमंत्री म्हणून अजित पवारांच्या माध्यमातून होत असलेला विकास घेऊन आम्ही बीडकरांसमोर जाऊ असे बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी सांगितले.
संदीप क्षीरसागर यांनी सांगितले की यांच्याकडे गेल्या 30 वर्षांपासून सत्ता असताना शहरात रस्ते, पाणी, पथदिव्यांची वाईट अवस्था बीडकर पाहत आहेत. आम्ही तगडे उमेदवार रिंगणात उतरवून कौल मागू, बीडकरांवर आमचा पुर्ण विश्वास आहे. यादी लवकरच जाहीर करु.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.