Beed News : जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्यानिमित्त बीडच्या गेवराईमध्ये लावण्यात आलेले ओबीसी नेत्यांचे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले, त्यामुळे ओबीसी नेते संतप्त झाले आहेत. या प्रकरणावरून ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी ‘असे कृत्य करणाऱ्यांना सरकारने आपल्या पद्धतीने आवरावे. तुम्ही तुमच्या हिशेबात राहा; ओबीसीला हिशेबात ठेवा,’ असे आवाहन केले आहे. (OBC leader warns govt over banner tearing)
बीड जिल्ह्यातील अंबड येथे शुक्रवारी (ता. १७ नोव्हेंबर) ओबीसींचा मेळावा होणार आहे. त्यानिमित्त बीडमध्ये ओबीसी नेत्यांसह मेळाव्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्या बॅनरवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर यांच्यासह विविध नेत्यांचे फोटो होते. ते बॅनर फाडण्यात आले आहेत. त्यामुळे ओबीसी नेत्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याबाबत ओबीसी नेते बाळासाहेब सानप म्हणाले की, राज्यात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करण्यात आलं आहे. भोकरदनमध्ये त्यांच्या लोकांनी बॅनर फाडलं आणि सभेत मात्र आमचं बॅनर फाडलं असे सांगितले जात आहे. या बॅनर फाडण्यामध्ये ओबीसींचा कुठलाही दोष नाही. बॅनर कोणी फाडले, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही जालन्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटणार आहोत.
सरकारला माझं आव्हान आहे की, अशा प्रकारचे कृत्य होत असेल तर संबंधितांना आवर घाला. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना सांगा. आता जे काल रात्रीपासून अनेक बॅनर पाडले गेले, ते चुकीचे आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये या गोष्टीला आवर घाला. राज्यात ७२ टक्के ओबीसी आहे. या ओबीसींची तुम्हाला आवश्यकता नसेल तर त्यावर तुम्ही विचार करा. यापुढे अशी कृत्ये होऊ नयेत, अशी आमची सरकारला विनंती असणार आहे, असेही सानप यांनी स्पष्ट केले.
सानप म्हणाले की, हे बॅनर कोणी फाडले, याची चौकशी झाली पाहिजे. जे दोषी आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, हीसुद्धा मागणी आम्ही करणार आहे. ओबीसींचा उद्या होणारा मेळावा हा क्रांतिकारी आहे. जवळपास १०० एकरमध्ये तो मेळावा होत आहे. तरीही जागा कमी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आम्ही कित्येक वर्षे ओबीसी नेत्यांना मदत केली, असे अनेकदा सांगितले जात आहे. पण, राज्यात १८४ आमदार मराठा समाजाचे आहेत, त्या मतदारसंघात ओबीसी नाहीत का. त्यांनी तुम्हाला मतदान केले नाही का. तुम्ही तुमच्या हिशेबात राहा; ओबीसीला हिशेबात ठेवा, एवढी आमची आंदोलकांना विनंती आहे, असेही सानप यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.