.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Marathwada Politics News : गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आॅपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू होती. अनेकदा शिवसेनेच्याच नेत्यांनी आॅपरेशन टायगर वगैरे काही नाही, आम्ही 2029 ची तयारी करतोय, असे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मराठवाडा दौऱ्यात आॅपरेशन टायगर असे काही नाही, म्हटले होते. प्रत्यक्षात मराठवाड्यातील धाराशीव, परभणी, हिंगोलीचे तीन खासदार या आॅपरेशन टायगरचे शिकार झाले आहेत.
ओम राजेनिंबाळकर, संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाने एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील आठ पैकी चार म्हणजे निम्म्या लोकसभा मतदारसंघावरील आपले दावेदारी फिक्स केली आहे. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीचे खाते कसबसे उघडले ते छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा मतदारसंघाने. संदीपान भुमरे यांच्या विजयाने मराठवाड्यात महायुतीचे नाक राहिले.
भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानूसार एकनाथ शिंदे यांनी राज्यात आॅपरेशन टायगर हाती घेतले आणि ते यशस्वी देखील केले. या आॅपरेशन मागे अनेक कारणे असली तरी मराठवाड्यातील चार लोकसभा मतदारसंघावर या राजकीय खेळीने शिवसेनेचा दावा फिक्स झाला आहे. मराठवाड्यात शिवसेना-भाजप युती असल्यापासून परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव या चार लोकसभेच्या जागा शिवसेनेकडे असायच्या. तर बीड, लातूर, जालना आणि नांदेड लोकसभा मतदारसंघ भाजपा लढवायचा.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दोन वर्ष आधी राज्यात शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपासोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पद मिळवले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आणि दिवगंत नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात एक मोठा गट सत्तेत सहभागी झाला. तीन पक्षांची महायुती सत्तेत असल्याने 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला हक्काच्या परभणीच्या जागेवर पाणी सोडावे लागले होते. इथे महायुतीकडून रासपचे महादेव जानकर हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवार होते.
तर शिंदेंच्या शिवसेनेला हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागा मिळाल्या. पैकी संदीपान भुमरे यांच्या रुपाने छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेने जिंकली होती. तर हिंगोलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे बाबुराव कदम यांचा पराभव केला होता.
आता तेच आष्टीकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. बीड, लातूर आणि नांदेड हे तीन मतदारसंघ भाजपाने तर धाराशीवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढली होती. चारशे पारचा नारा देणाऱ्या महायुतीचे या निवडणुकीत पानीपत झाले होते.
छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा महायुतीला जिंकता आली होती. उर्वरित सात जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. तीन काँग्रेस, तीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेली होती. दरम्यान, राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. केंद्रातील सत्तेला राज्यसभेत बहुमत गाठता यावे यासाठी अमित शहा यांच्या आदेशाने पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्रात आॅपरेशन लोटस, टायगर राबवले गेले.
महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 9 पैकी 6 खासदारांचा मोठा गट फोडत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खूष केले. ते करत असतानाच मराठवाड्यातील चार लोकसभा मतदारसंघही शिंदे यांनी फिक्स केले असे म्हणावे लागेल.
अर्थात 2029 मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुती कायम राहते की मग शिवसेना-भाजप हे दोन पक्ष स्वबळावर मैदानात उतरतात? यावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.