

Beed News : भाजप नेत्या तथा आमदार पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाबाबत केलेल्या एका सूचक वक्तव्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. "राजकारणात येऊन मला २४ वर्षे झाली आहेत. जर राजकारण माझ्या मनासारखं किंवा विचारांसारखं वाटलं नाही, तर जसा समृद्धी महामार्गाला बाहेर पडण्यासाठी एक्झिट असतो, तसाच मलाही वेळोवेळी राजकारणातून एक्झिट घ्यावा किंवा निवृत्त व्हावंसं वाटतं," असे त्या म्हणाल्या. मात्र, समोर जमलेला अलोट जनसमुदाय आणि जनतेचा उत्साह पाहिला की पुन्हा नव्याने उभारी मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या २४ वर्षांच्या राजकीय प्रवासावर आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मनमोकळेपणाने भाष्य केले. त्या म्हणाल्या, "आपण ज्या परिघात किंवा समाजात राहतो, तिथे प्रत्येक व्यक्तीला विचार मांडण्याचं आणि व्यक्त होण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे." राजकारणातील अंतर्गत घडामोडींवर सूचक टोला लगावत त्यांनी, "कोणी कितीही प्रयत्न केले तरी कोंबडा झाकल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही," असे वक्तव्य केले.
आपल्या राजकीय प्रवासातील चढ-उतारांचा उल्लेख करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "जेव्हा जेव्हा राजकारणाचा उबग येतो किंवा राजकीय वातावरण मनाविरुद्ध वाटतं, तेव्हा राजकारणातून बाजूला व्हावं, असं वाटतं. पण समोर जमलेला हा अलोट जनसमुदाय आणि जनतेचा उत्साह पाहिला की पुन्हा नव्याने उभारी मिळते. जनतेचं प्रेम आणि पाठबळ हीच माझी खरी ताकद असून तीच मला पुन्हा लढण्याची प्रेरणा देते."
पंकजा मुंडे यांच्या 'समृद्धी महामार्गाच्या एक्झिट' या उपमेने केलेल्या वक्तव्यामुळे बीडसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या विधानाचे विविध राजकीय अर्थ लावले जात असून, आगामी काळात त्यावर कोणत्या प्रतिक्रिया उमटतात, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.