Paranda News, 14 August : "तुम्हाला लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिलं, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुम्हांला मंत्रिपद मिळालं नाही, म्हणून तु्म्ही तीन वर्षे पुण्याला जाऊन बसलात," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आणि माजी आमदार राहुल मोटे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा परांडा शहरात आली होती. त्यावेळी राहुल मोटे यांनी सावंत यांच्या कार्यपद्धीवर टीका करत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलताना मोटे म्हणाले, "आरोग्य खात्याचं मंत्रीपद तानाजी सावंतांकडे आहे.
पण तुम्ही आजारी पडल्यानंतर आपण केलेल्या रुग्णालयात उपचार घेता की, तानाजी सावंतांनी (Tanaji Sawant) केलेल्या रुग्णालयात उपचार घेता? त्यांचा दवाखाना तुम्ही बघितला तरी आहे का? प्रत्येक वेळेस आल्यानंतर 100 खाटांचा दवाखाना केला, असं ते सांगतात. मात्र, ते सर्व दवाखाने केवळ कागदावर आहेत. तुम्हाला जनतेने पाच वर्षांची संधी दिली होती. मात्र, तुम्ही त्या संधीचा फायदा घेतला नाही.
तुम्हाला लोकांना काम करण्यासाठी निवडून दिलं होतं. पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून तु्म्ही तीन वर्षे पुण्याला (Pune) जाऊन रुसून बसलात. कोरोना काळात मी मतदारसंघात असायचो पण ते पुण्याला जाऊन बसायचे." यावेळी त्यांनी सावंत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले, 6 हजार कोटींचा अँम्बुलन्स घोटाळा, आरोग्य खात्याचा दोन हजार कोटींचा घोटाळा आणि कंत्राटी कामगारांमध्ये आणि पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या तपासणीच्या नावावर घोटाळा केला.
देवाच्या नावावर पैसे खाणाऱ्या माणसावरही आपण बोलूच. तानाजी सावंतांना खालच्या पातळीवर टीका करण्याची सवय आहे, मात्र, आपल्यावर ते संस्कार नाहीत, असंही मोटे यावेळी म्हणाले. तरुणांना आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण केल्यामुळे मी तीन वेळा निवडून आलो.
शिराळा उपसा सिंचन पूर्ण केला शिवाय 10 ते 15 स्टोरेज टँक माझ्या कार्यकाळात पूर्ण केले. शासकीय इमारतींचे देखील काम केलं. पण या पाच वर्षांत मतदारसंघात एकतरी नवीन पाझर तलाव, स्टोरेज टँक प्रशासकीय इमारत झाली का? असा प्रश्न देखील मोटे यांनी यावेळी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.