

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील २४ वर्षीय रोहित अनिल पठारे याच्या निर्घृण हत्येने मराठवाड्यासह राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. गणेश मंडळांमधील जुन्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, हत्येचे स्वरूप, कुटुंबीयांनी पोलिसांवर केलेले आरोप आणि आरोपींच्या अटकेतील कथित दिरंगाई यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
पीडित रोहित पठारे याला न्याय मिळावा, या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या एका तरुणाने आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या तरुणाने प्रशासनाच्या भूमिकेविरोधात हे टोकाचे पाऊल उचलल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आणि तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
वैजापूर शहरातील 'शान-ए-मराठा' आणि 'हिंदू हृदयसम्राट' या दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये गणेशोत्सव काळात वाद झाला होता. या जुन्या वादातून ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पुन्हा दोन गटांत संघर्ष झाला. या संघर्षादरम्यान रोहित पठारे याला त्याच्या घरातून बाहेर ओढून नेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर रोटेगाव परिसरातील शेतात झाडाला बांधून तलवारी, लोखंडी रॉड, कुऱ्हाडी आणि अन्य धारदार वस्तूंनी त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे कुटुंबीयांच्या तक्रारीत म्हटले आहे.
गंभीर जखमी रोहितला उपचारासाठी शिर्डी येथे दाखल करण्यात आले होते. ३ नोव्हेंबरच्या रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात रोहितची पत्नी शीतल पठारे यांच्या फिर्यादीवरून २६ जणांविरोधात खून आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रोहितच्या मृत्यूनंतर नातेवाईक आणि आंबेडकरी समाजातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुमारे चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. रोहितच्या आईने मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून वैजापूर पोलीस ठाण्यात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटनाही घडली. कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला तक्रारीची दखल घेण्यास विलंब केला आणि आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ७ नोव्हेंबर रोजी रोहितच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर शिरसाट यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तपासातील हलगर्जीपणाबद्दल त्यांनी जाब विचारला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास करण्याचे निर्देश दिले. तसेच कुटुंबाला सामाजिक न्याय विभागामार्फत पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी १२ नोव्हेंबर रोजी वैजापूरला भेट देऊन कुटुंबीयांची बाजू ऐकून घेतली. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही केली. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहितच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
त्यांनी या प्रकरणाच्या तपासावर असमाधान व्यक्त करत आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली नवीन एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. वैजापूरबाहेरील अधिकारी आणि महिला पोलिसांचाही या पथकात समावेश करावा, अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रोहितच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पक्षाचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचविण्यात आल्याचे सांगण्यात आले. आरोपींना कठोर शिक्षा, जलदगती न्यायालयात खटला आणि निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली. १२ नोव्हेंबरला पक्षाच्या शिष्टमंडळाने कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, संबंधित पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपी यांना निलंबित करावे, तसेच सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन आणि महाराष्ट्र बंदचा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणी ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांनी १० आरोपींना अटक केल्याची माहिती दिली होती. मुख्य आरोपी अमन सत्यपाल उंटवाल याला अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शहारेताकळी परिसरातून अटक करण्यात आली. या हत्येच्या तपासासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.