Saeed Khan : दोनच्या बदल्यात तीन, पाथरीत सईद खान यांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला दणका; तीन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Congress And NCP Political Setback In Parbhani : चार दिवसांपूर्वी आमदार सईद खान यांची सत्ता असलेल्या पाथरी नगर परिषदेमधील दोन नगरसेवकांनी गंभीर आरोप करत राष्ट्रवादीत जाणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर आमदार सईद खान यांनी देखील राष्ट्रवादीसह काँग्रेसला थेट आव्हान दिले होते.
Parbhani Politics: Three Corporators Join Shiv Sena in Pathri; Shivsena MLA Saeed Khan
Parbhani Politics: Three Corporators Join Shiv Sena in Pathri; Shivsena MLA Saeed KhanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Parbhani Politics : शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सईद खान यांची सत्ता असलेल्या पाथरी नगर परिषदेमधील दोन नगरसेवकांनी नगराध्यक्ष आसेफ खान यांच्या नेतृत्वावर तसेच भ्रष्ट कारभारावर आरोप करत राजीनामे दिले होते. त्यानंतर या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्यासोबत त्या पक्षात जाणार असल्याचे जाहीर केले होते. यावर सईद खान यांनी, 'आमचे दोन नगरसेवक नेले, तुमचे चार खेचून आणण्याची ताकद माझ्यात आहे,' असे सांगत विटेकर यांना व काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना आव्हान दिले होते.

सईद खान यांनी हे आव्हान दोन दिवसांतच खरे करून दाखवले. पाथरी नगर परिषदेमधील काँग्रेस पक्षाचे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा एक, अशा तीन नगरसेवकांनी आज मुंबईत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. दोनच्या बदल्यात तीन नगरसेवक फोडत सईद खान यांनी आमदार राजेश विटेकर आणि बाबाजानी दुर्राणी यांच्यावर कुरघोडी केली आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती असतानाही आमदार राजेश विटेकर यांनी माझ्या विरोधात काम केले, असा जाहीर आरोप सईद खान यांनी केला होता. तसेच योग्य वेळ आल्यावर याचा बदला घेतला जाईल, असा इशाराही दिला होता. दरम्यान, पाथरी नगर परिषदेच्या राजकारणात सईद खान यांना विटेकर यांनी नुकताच झटका दिला. शिवसेनेचे दोन नगरसेवक गळाला लावत त्यांनी मोठी खेळी केली होती.

Parbhani Politics: Three Corporators Join Shiv Sena in Pathri; Shivsena MLA Saeed Khan
Babajani Durrani Vs Saeed Khan : पाथरीत 243 कोटींच्या कथित भ्रष्टाचारावरून रणकंदन; सईद खानांचा दुर्राणींना तुरुंगाचा इशारा

यामुळे संख्याबळाचे गणित बिघडले आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढली. मात्र, या परिस्थितीवर सईद खान यांनी मात करत विटेकर-दुर्राणी यांच्यावर पलटवार करत त्यांच्या पक्षाचे तीन नगरसेवक गळाला लावले आहेत. कुरघोडीच्या राजकारणात सईद खान यांची सरशी झाली असली, तरी फोडाफोडीच्या राजकारणाला जिल्ह्यात यामुळे ऊत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिवसेनेचे आमदार सईद खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नईम खान उर्फ नम्मा आणि राजेश पाटील उर्फ रिंकू पाटील, तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोईज अन्सारी यांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पाथरी शहरात शिवसेनेची ताकद अधिक वाढली असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याचा दावा केला जात आहे.

या पक्षप्रवेशावेळी आमदार सईद खान, पाथरीचे नगराध्यक्ष आसेफ खान, उपनगराध्यक्ष आलोक चौधरी, अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष सलीम शेख यांच्यासह शिवसेनेचे अमोल भाले पाटील, गोविंद हरकाळ, उद्धव नाईक, साजेद राज, अनिल ढवळे, एजाज खान, लालू खान, शेख इरफान, युनूस बागवान, मुजमिल खान, बाळू कुऱ्हाडे यांची उपस्थिती होती.

पेच कायम..

१२ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील दोन नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामे दिले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाटेने जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये आलम तरन्नुम बेगम मुजीब आणि पठाण हसीब खान तहजीब खान यांचा समावेश आहे.

नगराध्यक्ष आसेफ खान यांच्या कथित भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नळपट्टी, घरपट्टी, आठवडी बाजार तसेच जागा आणि गाळ्यांच्या भाड्यापोटी जमा होणाऱ्या रकमेत अनियमितता होत असल्याचे आरोपही त्यांनी राजीनामापत्रात केले आहेत.

Parbhani Politics: Three Corporators Join Shiv Sena in Pathri; Shivsena MLA Saeed Khan
Saeed Khan Babajani Durrani : सईद खान-बाबाजानी दुर्राणी यांच्या राजकीय संघर्षात पाथरीकरांचे हाल!

पाथरी नगर परिषदेत शिवसेना (शिंदे गट) चे नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक होते. या दोघांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ सातवर आले आहे. तर काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादीचे दोन असे विरोधकांचे संख्याबळ १४ होते. आता ते तीनने घटले आहे. तर शिवसेनेचे संख्याबळ दहावर पोहोचले आहे. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेले राजीनामे अद्याप मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे पक्ष सोडून गेलेले आणि नव्याने पक्षात दाखल झालेले नगरसेवक नेमके कोणाचे, याचा पेच कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.