

Sambhaji Nagar News: महापालिकेतील शतप्रतिशत सत्तेच्या जोरावर भाजपाने निधी वाटपात विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांच्या निधीला कात्री लावली आहे. सत्ताधाऱ्यांना झुकते माप अन् विरोधकांच्या निधीत कपात केल्याने एमआयएमचे नगरसेवक संतापले आहेत. विरोधी पक्ष नेते समीर साजेद बिल्डर यांनी सभापतींनी सादर केलेले बजेट नियमानुसार नाही, स्थायी समितीच्या सदस्यांना अभ्यास करण्यासाठी बजेटचे पुस्तकच उपलब्ध करून देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे बजेट परत करावे, अन्यथा न्यायालयात दाद मागू असा इशारा दिला आहे.
महापालिकेचे 2026-27 या आर्थिक वर्षाचे बजेट स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी आज विशेष सर्वसाधारण सभेत महापौर समीर राजूरकर यांना सादर केले. प्रशासनाने सादर केलेल्या बजेटमध्ये तब्बल 130 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असून 3,354 कोटी 37 लाख 68 हजार रुपये जमा तर 3,353 कोटी 65 लाख 58 हजार खर्च तसंच 72 लाख 10 रुपये शिल्लक अशी आकडेमोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे निधी देताना सत्ताधाऱ्यांना झुकते माप तर विरोधकांच्या विकास निधीत कपात करण्यात आली आहे.
महापालिकेचे या वर्षाचे बजेट 25 मार्चला प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केले होते. त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर बजेट अंतिम करण्याचे अधिकार सभापती मकरिये यांना देण्यात आले होते. त्यानुसार मकरिये यांनी बजेटमध्येट 130 कोटी रुपयांची वाढ केली. बजेट सादर केल्यानंतर ते म्हणाले, ‘माझ्या शहराच्या विकासाविषयी ज्या काही संकल्पना होत्या, त्या बजेटमधून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
दरम्यान बजेटवर अभ्यास करण्यासाठी नगरसेवकांना वेळ देण्यात यावा, अशी मागणी राजू वैद्य, प्रमोद राठोड, त्र्यंबक तुपे, रशिद मामू यांच्यासह नगरसेवकांनी केली. त्यावर महापौरांनी सभा तहकूब करत 24 किंवा 26 तारखेला बजेटवर चर्चा करण्यासाठी सभेचे आयोजन केले जाईल, असे स्पष्ट केले.
सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकास 80 लाख रुपये वर्षभरात निधी मिळणार आहे. त्यात प्रशासनाकडून 25 लाख, स्थायी समितीकडून 50 लाख, स्वेच्छा निधी म्हणून 5 लाख रुपये असे निधीचे स्वरूप असेल. स्थायी समितीतील या पक्षाच्या सदस्यांना प्रत्येक 1 कोटी 30 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अमित भुईगळ व अफसर खान यांना प्रत्येकी 1 कोटी 30 लाख रुपये तर महिला सदस्याला 80 लाख रुपयाचा निधी देण्यात आला.
एमआयएमच्या प्रत्येक नगरसेवकाला 35 लाख रुपये मिळणार आहेत. त्यात प्रशासनाकडून 25 लाख, स्थायी समितीचे 5 लाख आणि स्वेच्छा निधी 5 लाख असे प्रमाण आहे. स्थायी समितीच्या तीन सदस्यांना 80 लाख रुपये मिळणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच नगरसेवकांना प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात आले. त्यात प्रशासनाकडून 25 लाख रुपये, स्थायी समितीकडून 25 लाख रुपये आणि स्वेच्छा निधी 5 लाख रुपये या प्रमाणे निधी देण्यात आला. स्थायी समितीचे सदस्य सचिन खैरे यांना 80 लाख रुपयांचा निधी मिळाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.