

Shivsena News : परभणीचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी गेल्या महिन्यात ३० ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेतला होता. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना हा मेळावा होत असल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण स्थळावरून म्हणजे अंतरवाली सराटीतून खासदार संजय जाधव यांना फोन करून मराठ्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिंदे यांचा मेळावा रद्द करा, अशी सूचना केली होती.
परंतू ऐनवेळी मेळावा रद्द करता येणार नाही, तो पूर्वनियोजित आहे, असे सांगत संजय जाधव यांनी हा मेळावा घेतला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि संजय जाधव यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. मराठा आंदोलक आणि जरांगे समर्थकांनी जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
या वादावर संजय जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची २० सप्टेंबर रोजी रुग्णालयात जाऊन भेट घेत पडदा टाकला होता. आता पुन्हा येत्या सात ऑक्टोबर रोजी त्याच परभणी शहरातील स्टेडियमवर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्तांना मदत वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आता मनोज जरांगे पाटील यांची नेमकी भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
खासदार संजय जाधव यांनी या कार्यक्रमाची माहिती काल माध्यमांना दिली. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी शिवसेनेचा मदतीचा हात म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्तांना मदतीचे वाटप करत प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वाधिक फटका बळीराजा आणि ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबांना बसत आहे.
पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या कठीण परिस्थितीत केवळ आश्वासने न देता दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला आहे. याच भूमिकेतून ७ ऑक्टोबर रोजी परभणी येथील स्टेडियम मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मदतवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमातून दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना शिलाई मशीन, गरजू मुलांना सायकली तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त कुटुंबांना धान्य किटचे वाटप करण्यात येणार आहे. शिवसेनेने कायमच ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचाराला प्राधान्य दिले आहे. आज दुष्काळाच्या संकटात हाच विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या मदतकार्याची सुरुवात परभणी जिल्ह्यातून होत असून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे. एकनाथ शिंदे हे संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्व आहे. शेतकरी अडचणीत असो, कष्टकरी कुटुंब संकटात असो किंवा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेला असो, अशा प्रत्येक वेळी शिवसेना आणि एकनाथ शिंदे मदतीचा हात पुढे करतात.
आज दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीतही शेतकर्यांना केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मदतकार्य उभे करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दुष्काळग्रस्त कुटुंबांना विविध स्वरूपात मदत देण्यासोबतच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली, असल्याचे खासदार संजय जाधव यांनी या कार्यक्रमाची माहिती देतांना माध्यमांना सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. मराठा समाजाला सरकारने वाटप केलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे वाटप करण्यात आलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र त्यांच्या सांगण्यावरूनच समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी रद्द करायला लावले, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील हे सातत्याने करत आहेत. शिंदे यांच्यावर सातत्याने आरोप आणि टीका होत असल्याने शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार हे देखील आता जरांगे पाटील यांच्याविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.
अशावेळी परभणी शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांना मदत वाटपाच्या कार्यक्रमाबाबत जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
याआधी ३० ऑगस्ट २०२६ रोजी परभणीत खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला जरांगे पाटील यांनी कडाडून विरोध केला होता. एवढेच नाही तर मेळावा रद्द केला नाही तर मी उपोषण सोडून परभणीला निघतो, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र जाधव यांनी तयारी पूर्ण झाल्याचे सांगत मेळावा रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे मेळावा नियोजित वेळेनुसार झाला.
शिंदे यांच्या भाषणावेळी काही मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले होते. शिंदे यांनी यावेळी जरांगे यांच्या मराठा समाजासाठीच्या भूमिकेचा उल्लेख करत, इतर समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचे सांगितले होते.
या मेळाव्यावरून झालेल्या वादानंतर खासदार संजय जाधव यांनी २० सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. अंतरवाली सराटी हे माझ्या लोकसभा मतदारसंघातील गाव असून जरांगे पाटील आणि माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. घरातील व्यक्ती आजारी असेल तर भेट घेणे हे माझे कर्तव्य आहे, अशी भूमिका घेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.