Abdul Sattar : तीनवेळा सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातून निवडून आलेले आणि राज्यात मंत्री झालेले अब्दुल सत्तार मतदारसंघातील छोट्या निवडणुकीलाही गांभीर्याने घेतात. अगदी ग्रामपंचायत, नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समितीसह सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली मजबूत पकड असली पाहिजे, असा प्रत्येक आमदार, मंत्र्याचा प्रयत्न असतो. सत्तारही त्यापेक्षा वेगळे नाहीत, हे त्यांनी आतापर्यंत दाखवून दिले आहे.
जिल्हा मजूर सहकारी संस्था निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अब्दुल सत्तार आता मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता राखण्यासाठी कामाला लागले आहेत. येत्या 28 तारखेला सिल्लोड - सोयगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या संचालक मंडळासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अब्दुल सत्तार यांनी हिंदू देवदेवतांच्या मंदिरातून वाढवला.
तसेच मतदारसंघातील संत - महंताचे आशिर्वाद घेत प्रचाराला सुरूवात केली. जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ सिल्लोड येथील श्री म्हसोबा महाराज संस्थान, श्रीराम मंदिर सिल्लोड, धोत्रा येथील श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर तसेच श्री क्षेत्र मुर्डेश्वर संस्थान केळगाव येथे प्रचार नारळ फोडून करण्यात आला. तसेच श्री मुर्डेश्वर संस्थान येथील श्रीराम मंदिर जवळील सभागृहात पहिली प्रचार सभाही घेतली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांना कपबशी या निशाणीवर मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन सत्तार यांनी यावेळी केले. देशभरात सध्या अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वातावरण आहे. हे हेरूनच सत्तार यांनी आपल्या पॅनलचे नाव श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनल ठेवल्याची चर्चा होत आहे.
गेल्या बाजार समितीत अब्दुल सत्तार यांचीच एकहाती सत्ता होती, ती पुन्हा राखण्यासाठी या पॅनलसमोर फार मोठे आव्हान असणार नाही, असे चित्र आहे. आतापर्यंत सत्तार यांना मतदारंघात भाजप हाच सर्वात मोठा विरोधक होता. परंतु राज्यात शिवसेना - भाजप - राष्ट्रवादी ट्रिपल इंजिनचे सरकार आल्यापासून त्यांना विरोधकच उरला नाही.
ठाकरे गटाची मतदारसंघात ताकद नसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत काही चमत्कार घडेल अशी अपेक्षा नसली तरी सत्तार व त्यांचे उमेदवार मात्र गाफील राहण्याची चूक करणार नाहीत. त्यामुळे ही निवडणुक सत्तार आणि त्यांचे उमेदवार गांभीर्यानेच लढणार आहेत. मंदिरातून प्रचाराची सुरूवात आणि संत - महंताचे आशिर्वाद सत्तारांना विजयाच्या रुपात मिळतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.