Sunetra Pawar : बीडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता धोक्यात : पंडित-मुंडेंच्या वर्चस्वाच्या लढाईत सुनेत्रा पवार करणार डॅमेज कंट्रोल

Sunetra Pawar to focus on NCP organisation News : दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या बारामती पॅटर्नकडे पाहून बीडकरांनी नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती सोपवली होती. परंतु अजित पवारांचे एका विमान अपघातात निधन झाले आणि बीडच्या विकासाच्या आशा पुन्हा मावळल्या.
NCP
NCPSarkarnama
Published on
Updated on

NCP Politics : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पुन्हा दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. 14 व 15 ऑगस्टला त्या बीडमध्ये असणार आहेत. नुकताच डीपीडीसी आणि विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण, भूमीपूजनासाठी त्यांचा बीड दौरा झाला होता. पण पक्षांतर्गत गटबाजी, नगरपालिकेतील नगरसेवकांमधील वाद यावर त्या दौऱ्यात फारशी चर्चा त्यांना करता आली नव्हती.

यावेळी मात्र पक्षातील तंटे, नगरपालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी नगरसेवकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न यासह पक्षाची विस्कटलेली घडी नीट बसवण्यावर सुनेत्रा पवार विशेष लक्ष देणार आहेत. दोन दिवसांच्या या आपल्या दौऱ्यात त्यांनी संघटनात्मक बैठकीसाठी वेळ राखून ठेवली आहे.

दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या बारामती पॅटर्नकडे पाहून बीडकरांनी नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती सोपवली होती. परंतु अजित पवारांचे एका विमान अपघातात निधन झाले आणि बीडच्या विकासाच्या आशा पुन्हा मावळल्या. नगरपालिकेची सत्ता हाती येऊन सात महिने उलटले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरात भरीव काम करता आले नाही.

यावरून पक्षाच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्येच दोन गट पडले. सुनेत्रा पवार यांच्या मागच्या दौऱ्यातच ही गटबाजी चव्हाट्यावर आली होती. नगरपालिकेतील सत्ता आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेले जिल्ह्यातील नेते आमदार विजयसिंह पंडित, धनंजय मुंडे यांनीही हात वर केले.

पंडित हे या विषयावर काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे नगरसेवकांची नाराजी त्यांच्याबद्दल वाढू लागली आहे. यातूनच अकरा नगरसेवकांनी विजयसिंह पंडित यांचे फोटो आपल्या सोशल मिडिया पेजवरून हटवल्याचा प्रकार समोर आला होता. हे अकरा नगरसेवक कोणत्याही क्षणी बंड पुकारतील आणि नशिबाने मिळालेली नगरपालिकेची सत्ता विरोधकांच्या हाती जाईल, अशी परिस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचा पुढील दोन दिवसांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात नगरसेवकांची नाराजी दूर करतानाच जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांना एकत्र आणण्याचे अवघड कामही सुनेत्रा पवार यांना करावे लागणार आहे. आमदार विजयसिंह पंडित, माजलगावचे प्रकाश सोळंके, परळीचे धनंजय मुंडे यांचेच एकमेकांशी पटत नाही, असे चित्र आहे. याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्यावर असलेली पकड सैल होण्यावर होत आहे.

NCP
NCP News : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; सुनेत्रा पवारांच्या टीकेचा निषेध करताना स्वतंत्र आंदोलन!

मुंडे-पंडितांमध्ये नेता होण्याची स्पर्धा?

गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांची ही पहिलीच टर्म आहे. घराण्यातून त्यांना राजकीय वारसा मिळालेला असला तरी जे संबंध माजी आमदार अमरसिंह पंडीत यांनी धनंजय मुंडे यांच्यांशी जपले होते, ते विजयसिंह यांना जपता आलेले नाहीत. एकाच पक्षात असूनही हे दोन आमदार क्वचितच एकत्र दिसतात. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली होती.

या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी त्या परिस्थितीनुसार जिल्ह्याच्या नेतृ्त्वात काही प्रयोग केले. बीड नगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी त्याची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याऐवजी नवख्या विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवली. दरम्यानच्या काळात अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना जाहीर कार्यक्रमात त्यांच्यासोबत फारसे येऊ दिले नव्हते.

NCP
NCP News : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; सुनेत्रा पवारांच्या टीकेचा निषेध करताना स्वतंत्र आंदोलन!

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मुंडे यांच्यावर असलेला मराठा समाजाचा राग, मतपेटीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवर व्यक्त होऊ नये, याची काळजी तेव्हा अजित पवारांनी घेतली होती. त्याचा परिणाम देखील नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून आला आणि पंडित यांच्या नेतृत्वात पक्षाचे 19 नगरसेवक निवडून आले.

बीड नगरपालिकेची सत्ता हाती आल्यामुळे पंडित यांचे जिल्ह्यातील राजकीय वजनही वाढले. आता जिल्ह्याचा नेता होण्यासाठी या दोघांमध्ये स्पर्धा सुरू असल्याची चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींवर पालकमंत्री सुनेत्रा पवार कसा तोडगा काढणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आगामी काळात बीड जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. त्यासाठी तयारी करायची असेल तर आधी पक्षातील कुरबुरी मिटवाव्या लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com