
Beed News : भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारी प्रकरणं बाहेर काढल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले.तसेच त्यांनी या प्रकरणातून थेट मंत्री व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनाच टार्गेट केल्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला. पण शुक्रवारी (ता.14) या दोन्ही नेत्यांमध्ये एक नव्हे तर दोन गुप्त बैठका झाल्याचे समोर आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. यावरुन आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार धसांवर 'गंगाधर ही शक्तिमान' असल्याचं म्हणत टीकेची झोड उठवली
भाजपचे आष्टीचे आमदार सुरेस धस आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची गेल्या काही दिवसांत दोनवेळा भेट झाल्याची माहिती समोर आली.एक भेट ही भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी तर दुसरी धनंजय मुंडेंच्या ऑपरेशननंतर दोन दिवसांपूर्वीच झाल्याचं आता खुद्द धस यांनीही मान्य केलं आहे. यावर आता शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
अंधारे म्हणाल्या, सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेऊन बीडच्या जनतेचा विश्वास गमावला. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कधी ते पोलिसांना माफ करा म्हणतात, कधी ते धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात.ही संभ्रमावस्था ते का निर्माण करतात? ते फक्त स्वतःचा विश्वास गमावत नाहीत तर ते देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता सुद्धा गमवत आहेत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
तसेच सुरेश धस यांनी जो लढा उभा केला होता,तो फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिथे राष्ट्रवादी आहे, तिथे भाजपचा शिरकाव करण्यासाठीच होता असा आरोपही सुषमा अंधारे यांनी यावेळी केला.तसेच मराठा नेता म्हणून धस यांची तर फडणवीसांची बाहुबली इमेज प्रस्थापित करणं एवढेच काम त्यांना करायचं होतं.ते काम फत्ते झाल्यानंतर आता एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्यानंतरही काय फरक पडतो असं त्यांना वाटत असणार असा टोलाही त्यांनी लगावला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, खरंतर सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना साडेचार तास भेटले की साडेचार मिनिटे भेटले हा मुद्दा महत्त्वाचा नाही. या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसे शकतात? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.पण मला संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे वाईट वाटतं, ज्यांनी धसांवर एवढा विश्वास टाकला आहे.महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीनं सुरेश धसांवर जो विश्वास दाखवला होता, तो आता त्यांनी मातीमोल ठरवल्याचा घणाघात करत गंगाधर ही शक्तिमान है असं आम्हाला खेदानं म्हणावं लागतंय असंही अंधारेंनी यावेळी सांगितलं
बीड,परळीमधील आकाचा आका म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना जेरीस आणलं.पण याच सुरेश धसांनी थेट धनंजय मुंडेंच भेट घेतल्यानं विरोधकांना टीकेसाठी आयतं कोलीत मिळालं आहे. त्यामुळे बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणावरुन महाराष्ट्राचं राजकारण आता पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
भाजप प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यासोबत साडेचार तासांची बैठक झाली होती,अशी कबुली दिली.ते म्हणाले,आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो.सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही होते.दोघांमध्ये मतभेद आहेत,मनभेद नाहीत.दोघेही इमोशनल आहेत.दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील.माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो,काळ मतभेद दूर करतो असंही बावनकुळेंनी सांगितलं होतं.
तसेच लवकरच मुंडे आणि धस यांच्यातील मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष असून माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसल्याची माहिती बावनकुळेंनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.