Hingoli, 06 July : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेले बेमुदत उपोषण स्थगित करत राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत देण्यात आलेली मुदत संपत आली आहे. ही मुदत संपण्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात शांतता रॅली सुरू केली आहे. ही शांतता रॅली मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांतून काढण्यात येणार आहे. हिंगोली येथून आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शांतता रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीत हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सहभागी झाले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election ) मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता सातही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (Shivsena) ठाकरे गट महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar) हे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील महायुती सरकारविरोधात असलेला रोष मतदान यंत्रातून बाहेर पडला.
हिंगोलीत आष्टीकर यांना मराठा समाजाची एकगठ्ठा मते मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलेल्या बाबुराव कदम यांचा दणदणीत पराभव केला होता. या विजयानंतर आष्टीकर यांनी आपण लोकसभेत मराठा आरक्षणाचा विषय लावून धरणार अशी, ग्वाही दिली होती. त्यानंतर आज हिंगोलीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपस्थितीत निघालेल्या शांतता रॅलीत सहभागी होत आष्टीकर यांनी मराठा आरक्षणाला व मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी 8 जून रोजी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह गेलेल्या शिष्टमंडळाने एक महिन्याची मुदत जरांगे पाटील यांच्याकडे मागितली होती. त्यानुसार 13 जून रोजी जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची मुदत देत उपोषण स्थगित केले होते.
दरम्यान, अंतरवाली सराटीपासून काही अंतरावर असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावसाठी प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी दहा दिवसांहून अधिक काळ उपोषण सुरू केले. त्यामुळे मराठवाड्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण झाला. राज्य सरकार 13 जुलै रोजी काय निर्णय घेईल, याची वाट न पाहता मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात शांतता रॅली काढत समाजामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा जागृती सुरू केली आहे.
मराठवाड्यात बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, जालना मतदारसंघात महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले. यापैकी बहुतांश खासदारांनी अंतरवाली येथे उपोषणादरम्यान व त्याआधी जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.
महायुतीचे लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडून आलेले एकमेव महायुतीचे खासदार संदीपान भुमरे यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज शांतता रॅलीत सहभागी होत मराठा आरक्षण आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.