

Uddhav Thackeray: राजकारणात वाईट काळ असला की नवे नवे राजकारणात आलेलेही भल्याभल्यांना सल्ले देऊ लागतात. असाच सल्ला शिंदेसेनेचे नवनिर्वाचित आमदार सईद खान यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
"उद्धव ठाकरे यांना 19 खासदार आणि 40 आमदार गेल्या अडीच तीन वर्षात सोडून गेले आहेत. कार्यकर्त्यांशी संपर्क न ठेवल्यामुळं आणि नेते पदाधिकाऱ्यांना वेळ न दिल्यामुळं अख्खा पक्ष संपत आला आहे," अशी टीका करतानाच सईद खान यांनी उद्धव ठाकरे यांनी आता तरी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला दिला आहे.
कोणताही राजकीय पक्ष घरात बसून चालत नसतो. आमचे नेते एकनाथ शिंदे हे 24 तास जनतेमध्ये जाऊन काम करतात. उद्धव ठाकरे मात्र ते मुख्यमंत्री असतानाच्या काळात कधी मंत्रालयातही आले नाहीत. पक्ष संघटना घरात बसून वाढत नसते. नायक चित्रपटातील मुख्यमंत्री असलेल्या अनिल कपूर सारखे एकनाथ शिंदे यांचं काम आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेची विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी शिवसेनेत दाखल होत आहेत. शिवसेनेत उठाव झाल्यानंतर शिंदेसाहेबांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार आले होते.
१३ खासदारांनीही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याला पसंती दिली होती. आता पुन्हा सहा खासदार शिवसेनेत दाखल झाल्याने आमच्याकडे असलेल्या खासदारांची संख्या वाढली आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या येत्या महिनाभरात अजून वाढणार आहे. 14 आमदार लवकरच ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील असा दावाही सईद खान यांनी केला.
याशिवाय राज्यभरातून अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत. उद्धव ठाकरे यांनी आता तरी यातून धडा घ्यावा, आत्मपरीक्षण करावं याचा पुनरुच्चार खान यांनी केला. एकनाथ शिंदे हे सर्वमान्य नेते असून ते कायम लोकांमध्ये असतात आणि म्हणूनच त्यांच्यावर महाराष्ट्रातील जनता प्रेम करते असेही सईद खान यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.