

Thane News : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्य्रातील निकाल चांगलाच लक्षवेधी ठरला होता. माजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंब्य्रात एमआयएमच्या तिकीटावर सहर शेखने इतिहास घडवत निवडणूक जिंकली होती. यानंतर तिनं कैसे हराया म्हणत विजयी सभेतूनच आव्हाडांना डिवचलं होतं. तसेच पुढच्या निवडणुकीत संपूर्ण मुंब्रा हिरवा करुन टाकण्यासंदर्भातलं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन बरीच टीका झाल्यानंतर तिनं माफीही मागितली होती. आता तीच सहर शेख Sahar Shaikh पुन्हा चर्चेत आली आहे.
महाराष्ट्रानंतर तेलंगणातही नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात एमआयएम पक्षातून आपला जिंकण्याचा स्ट्राईक रेट कायम ठेवत 60 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला. या निवडणुकांच्या प्रचारासाठी एमआयएम पक्षानं मुंब्रा येथील नवनिर्वाचित तरुण नगरसेविका सहर शेखलाही बोलावण्यात आलं होतं.
हैदराबाद येथे एमआयएम पक्षाच्या भव्य कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेखनं खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या समोरच धडाकेबाज भाषण ठोकलं. यावेळी केलेल्या भाषणात सहरच्या ‘कैसे हराया’ या डायलॉगची जादूही दिसून आली. यावेळी भाषण करताना सहर शेखने खासदार असुदद्दीन ओवैसींसाठी खास शेरही ऐकवताच उपस्थितांनी टाळ्या, शिट्ट्या,घोषणाबाजी करत वातावरणात उत्साह भरला.
एमआयएमची तरुण नगरसेविका असलेली सहर शेखनं तेलंगणामधील निवडणुकीत तीन दिवस प्रचारात सहभागी झाली होती. माझ्या दोन विधानांमुळे एमआयएम पक्षाच्या उमेदवारांना फायदा झाला आणि ते जिंकले असं नाही. तर, ही संपूर्ण टीमची मेहनत असल्याचा दावा तिने केला. तसेच लोकांचे प्रेम व आशीर्वाद यामुळेच इतका मोठा सन्मान मिळाला.
याठिकाणीही नोटाचा वापर करण्यात आला. त्याचं कारण म्हणजे काही वॉर्डमध्ये आमच्या पक्षाचे उमेदवारच नव्हते. तेलंगणामध्येही अनेक लोकांनी नोटा चा वापर केल्याचंही सहर म्हणाली. मात्र, निवडणुकीचा प्रचार करताना, मेहनत, समर्पण, प्रेरणा, सातत्यसह जनतेचं प्रेम, पाठिंबा हेही तितकंच महत्वाचं असतं, असंही परखड मत सहर शेखनं व्यक्त केलं.
तेलंगणातील कामारेड्डी, संगारेड्डी, इस्लामपूरा, पेद्दापल्ली, करीमनगर यांसारख्या अनेक ठिकाणी प्रचार केल्याचं तिने सांगितलं. त्यात करीमनगर, कामारेड्डी आणि संगारेड्डी येथे एमआयएमच्या उमेदवारांनी विजय मिळवल्याचं सहरने सांगितलं.
तसेच तिनं आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी कसं नियोजन केलं होतं. याबाबत बोलताना आम्ही जिंकलेली ही निवडणूक लोकांना सहज जिंकली असे वाटेल, पण तसे नसल्याचं सांगतानाच तिनं निवडणुकीपूर्वीच संपूर्ण प्रचाराचं नियोजन केल्याचं नमूद केलं. घरोघर किती दिवस, कुठल्या भागात किती जनसंपर्क, किती सभा घ्यायच्या आणि कोणत्या मुद्द्यांवर बोलू याबाबतही नियोजन करण्यात आल्याचंही सहर शेख म्हणाली.
एमआयएमचं तिकीट कसं मिळालं याबाबत सहर शेख म्हणाली,"ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शेवटच्या दिवसापर्यंत मला तिकीट देणार असल्याचं जितेंद्र आव्हाड सांगत होते. त्यावेळी आम्ही सर्वात मोठी रॅली काढली. तरीही त्यांनी दिलेला शब्द फिरवला. हे असे नेते लोकांना शब्द देतात, त्याच्यामागचा त्यांचा हेतू समजवून घ्यावा लागेल असंही सहर यांनी स्पष्ट केलं.
तसेच ही नेतेमंडळी शेवटच्या क्षणापर्यंत असे आपल्याला ताटकळत ठेवतात, म्हणजे आपण इकडचे पण राहणार नाही आणि तिकडचेही राहणार नाही. आम्हाला जर आधीच माहिती असतं तर आमच्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी तयार होती. पण ते भाजपसोबत असल्यामुळे आम्ही त्यांना नाही म्हटलं. त्यामुळेच ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचं ठरवलं."
पण मी ज्यावेळी फॉर्म भरायले गेले, त्यावेळी आतमध्ये काँग्रेस आणि एमआयएमचे लोक समोर एबी फॉर्म घेऊन उभे होते. त्यावेळी एमआयएमची ऑफर आल्यानंतर ती मला अल्लाहने पाठवल्याचा भास झाला. त्याचवेळी मी त्यांची ऑफर स्वीकारली आणि एमआयएममधून लढून जिंकले, असा अनुभवही सहर शेख यांनी सांगितला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.