मनसे नेते प्रकाश महाजन यांनी अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांच्या भाजप प्रवेशावरून हल्लाबोल केला आहे. भाजपत अंतर्गत कलह खूप आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांसारखे अनेकजण भाजपत येतील. राज ठाकरेंचे हिंदुत्वाबाबत विचार स्पष्ट आहेत. अशोक चव्हाण कोणत्या तोंडानं हिंदुत्वाबाबत बोलणार? असा सवाल प्रकाश महाजनांनी भाजपला केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
प्रकाश महाजन म्हणाले, "'देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) कुठेतरी उल्लेख केला की मनसेबरोबर युती नाही, सोबत काम करू.' मैत्री चहापुरती नको आम्हाला राजकारणासाठी पाहिजे. राज ठाकरे हिंदुत्वाचा विशाल दृष्टिकोन घेऊन काम करत आहेत. खरं म्हणजे हिंदुत्व मानणाऱ्या पक्षाशी युती करण्यास काहीही हरकत नाही."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"भाजपनं अशोक चव्हाणांवर आरोप केले होते, तरीसुद्धा पक्षात घेतलं आहे. आमच्या पक्षात कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. पण भाजप त्यावर का विचार करत नाही? आम्ही निवडणुकीला स्वतंत्र तयारी करू. पक्षनेतृत्व ठरवतील ज्या जागा लढू. हिंदुत्वाच्या प्रश्नावर भाजप आम्हाला दूर का लोटत आहे? कुणी कुणासाठी थांबत नसतो. प्रत्येक पक्ष निवडणुकीची तयारी करतो. आम्ही आमची तयारी करत आहोत. युती झाली, तर ठीक नाही तर आमची स्वतंत्र तयारी सुरू आहे," असं प्रकाश महाजनांनी सांगितलं.
"भ्रष्टाचार संपवायला निघालेली भाजप भ्रष्टाचारी लोकांनाच आपल्या पक्षात सामावून घेत आहे. मग, पुढील काळात भाजप कुणाशी लढणार आहे? कारण सगळे भ्रष्टाचारी तर घरातच आहेत. भाजप निवडणुकीत काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आदर्श घोटाळ्यात शहीद सैनिकांच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्याचा आरोप चव्हाणांवर करण्यात आला. त्यांनाच भाजपत प्रवेश दिला. प्रवेश केल्यानंतर चव्हाण म्हणाले, 'मला बावनकुळेंनी पक्ष सदस्यत्वाची पावती दिली, त्याचे पैसे मी दिले.' पण, ते पैसे आदर्श घोटाळ्यातील नसतील ना?" अशी शंका प्रकाश महाजनांनी व्यक्त केली आहे.
"आदर्श घोटाळा, शिखर बँक, जरांडेश्वर कारखान्याचं काय झालं? कन्नड कारखान्याच्या भ्रष्टाचारप्रकरणी रोहित पवारांना जबाबदार धरण्यात येत आहे. हा भ्रष्टाचार अजित पवार आणि रोहित पवार एकत्र असताना झाला आहे, मग रोहित पवारांची चौकशी का करता? अजित पवारांना क्लीन चिट मिळाली का?" असा सवाल महाजनांनी उपस्थित केला.
"महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व सक्षम नाही. भाजपत अंतर्गत कलह खूप आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांसारखे अनेकजण भाजपत येतील. बाहेरच्या लोकांवर यश मिळवण्यासाठी भाजप तयारी करत आहे. मग, आम्ही वाईट आहोत का? राज ठाकरेंना तरुणांचा नेता म्हणून ओळखलं जातं. त्यांची महाराष्ट्राबाबत दूरदृष्टी आणि हिंदुत्वाबाबत विचार स्पष्ट आहेत. हे तुम्हाला चालत नाहीत. अशोक चव्हाण कोणत्या तोंडानं हिंदुत्वावर बोलणार?" असा प्रश्न महाजनांनी भाजपला केला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.