
Mumbai News : विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. राज्य सरकारनं (State Government) आता बहुप्रतिक्षित पुणे-ठाण्यासह राज्यातील 9 प्रमुख महापालिकांमधील प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबईमध्ये एकसदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
राज्य सरकारनं मंगळवारी (ता.10) महापालिका,नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. या महापालिका अ, ब आणि क वर्गातील आहेत.सरकारनं प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिलेल्या महापालिकांमध्ये मुंबई,ठाणे,नवी मुंबई,वसई विरार,पुणे,पिंपरी चिंचवड,छत्रपती संभाजीनगर, नागपूर,नाशिक आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी झालेल्या सुनावणीवेळी अडीच- तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे प्रलंबित या सर्व निवडणुका ऑक्टोबरपर्यंत घेण्याचा आयोगाच्या उद्देशानं आता सरकारनं पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तीन टप्प्यात घेण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली होती. याचवेळी त्यांनी स्थानिकच्या निवडणुका येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातील,असेही म्हटलं होतं.
महाराष्ट्रात मुंबई,पुणे,छत्रपती संभाजीनगर यांसह 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका,26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या सर्वठिकाणी प्रशासक गाडा हाकत आहेत. या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यासंबंधी घडामोडींनी वेग घेतला आहे. या निवडणुकीसाठी प्रभाग रचना (Ward Formation) तयार करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून आदेश दिले आहेत.
राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांच्या लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने आता प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आले आहेत.
मुंबईत जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. मुंबई महानगरपालिकेत 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार असून नवीमुंबई,पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर,ठाणे, नाशिक, छ. संभाजीनगर यांसह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.
अ- वर्गात पुणे, नागपूर, ब वर्ग - ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, क वर्ग - नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली या महापालिकांचा समावेश होतो. तर ड महापालिकांमध्ये अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकांचा समावेश आहे.
या महापालिकांमध्ये सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करण्याबाबत विचार सुरू आहे. पण सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा 5 सदस्य किंवा दोन प्रभाग 3 सदस्यांचा तयार होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.