Mohite Patil : मोहिते पाटलांनी भाजप नेत्यांसोबतचे व्यासपीठ पुन्हा का सोडले; ‘त्या’ गोष्टीची धास्ती की आणखी काही?

Solapur- Goa Air Service : भाजपच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव वगळता भाजपचे सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांची नावे होती. भाजपकडून निमंत्रण पत्रिकेत डावलूनही आमदार मोहिते पाटील हे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
Ranjitsinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil
Ranjitsinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 June : सोलापूरमधील भारतीय जनता पक्ष आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात सध्या विळ्या भोपळ्याचे सख्य असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या उद्‌घाटन समारंभाच्या भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेत आमदार मोहिते पाटील यांचे नाव छापण्यात आले नव्हते. त्या निमंत्रण पत्रिकेवर भाजप जिल्हाध्यक्षांची नावे होती. मात्र आमदाराचे नाव नव्हते. मात्र कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे बंधू खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विमानसेवेची निवेदक माहिती देत असतानाच पुन्हा व्यासपीठ सोडले.

सोलापूर (Solapur) -गोवा विमानसेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन करण्यात येणार होते, त्यामुळे सोलापूरमधील भाजपचे झाडून सारे नेते उपस्थित होते. विमानसेवेच्या उद्‌घाटन समारंभाची फ्लाय 91 विमान कंपनीकडून कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापण्यात आली होती. त्या कार्यक्रम पत्रिकेत सत्ताधारी आमदार, खासदारांसह विरोधी पक्षाचे आमदार आणि खासदारांची नावे होती.

भाजपच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांचे नाव वगळता भाजपचे सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांची नावे होती. भाजपकडून निमंत्रण पत्रिकेत डावलूनही आमदार मोहिते पाटील हे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. मात्र, सोलापूरच्या विमानतळावरून सिग्नल न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोलापूरला येता आले नाही.

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सोलापूर-गोवा विमानसेवेचे उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, विमानसेवेबाबत निवेदक माहिती देत असतानाच प्रथम आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्यापाठोपाठ खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यासपीठ सोडले. त्यांच्या व्यासपीठ सोडण्याची पुन्हा चर्चा रंगली आहे.

Ranjitsinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil
Raju Khare : ‘मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली’ म्हणणाऱ्या आमदार राजू खरेंची राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनालाही दांडी!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती. त्या कार्यक्रमास गोरे थोड्या उशिराने आले होते. त्यांच्या एन्ट्रीनंतर रणजितसिंह मोहिते पाटील हे स्टेज सोडून गेले होते. तत्पूर्वी त्यांनी चंद्रकांत पाटील आणि गोरे यांच्या कानात काहीतरी सांगितले होते.

सोलापूर विद्यापीठातील कार्यक्रमापाठोपाठ विमानसेवा उद्‌घाटनाच्या कार्यक्रमातूनही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्टेज सोडल्याने पुन्हा एकदा कुजबूज सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या स्टेज सोडण्याचे कारण समजू शकले नाही. मात्र लागोपाठच्या दोन कार्यक्रमातून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्टेज सोडल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

Ranjitsinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil
Satyajeet Patankar : उदयनराजेंनी ‘डच्चू देण्याची’ कोटी करताच सत्यजित पाटणकरांनी बोलून दाखवली ‘आयुष्यातून उठण्याची’ भीती!

त्या घटनेची धास्ती?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आले होते. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या समोरच त्यांच्यावरील कारवाईबाबतचा प्रश्न पत्रकार परिषदेत बावनकुळेंना विचारण्यात आला होता. त्यावर बावनकुळे उत्तर देत असताना आमदार मोहिते पाटील यांनी मान खाली घातली होती. त्या घटनेची धास्ती मोहिते पाटील यांनी घेतली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com