Nagpur Graduate Constituency Results : नागपूर पदवीधरमध्ये भाजप-काँग्रेसला धक्का? निकालाआधीच कराळे मास्तरांचा विजयाचा दावा; पहिल्या फेरीत 40-45 हजार मते मिळतील

Nitesh Karale On Nagpur MLC Election Results : नागपूर पदवीधर मतदारसंघाचा मतमोजणीला सुरूवात झाली असून काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. या मतदारसंघाच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Nagpur MLC Election Results; Nitesh Karale
Nagpur MLC Election Results; Nitesh KaraleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur MLC Election News : राज्यातील पाच शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर आज मतमोजणी होत आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातही मतमोजणीला सुरुवात झाली असून, या मतदारसंघाच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. येथे काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, निकालाआधीच पहिल्या फेरीत ४० ते ४५ हजार मते मिळतील आणि मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास नागपूर पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनी व्यक्त केला आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कराळे यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

नागपूर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची प्रत्यक्ष मतमोजणी दुपारी ३ ते ४ वाजल्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा तयार करण्यात आला आहे. तसेच, मतमोजणीसाठी एकूण १४ टेबल असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण १ लाख ६५ हजार ५४१ मतांची नोंद झाली आहे.

मतमोजणीसाठी २५-२५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात आले असून, एकूण सुमारे ६ हजार ६२१ गठ्ठे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक टेबलवर पहिल्या फेरीत २५ मतपत्रिकांचे ४० गठ्ठे मोजले जाणार आहेत. त्यामुळे एका टेबलवर सुमारे एक हजार मतांची मोजणी होईल. मतमोजणीसाठी एकूण ८४ टेबलची व्यवस्था करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत सुमारे ८५ हजार मतांची मोजणी होण्याची शक्यता आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचा पहिला कल दुपारी दोन वाजता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nagpur MLC Election Results; Nitesh Karale
Marathwada Graduate Constituency Election: ‘माझा विजय पक्का, गुलाल घेऊनच आलोय!’; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा दावा

दरम्यान, नागपूर विभागात एकूण २३८ पोस्टल मतांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३४ पोस्टल मते बाद ठरली असून, एकूण २०४ पोस्टल मते वैध ठरल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आलेल्या अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

कराळे मास्तर यांनी निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. या निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आणि ऐतिहासिक असेल. पहिल्या फेरीत आपल्याला ४० ते ४५ हजार मते मिळतील आणि दुसऱ्या फेरीत विजय होईल, असा दावा कराळे मास्तर यांनी केला आहे. तसेच, भाजपविरोधात लोकांमध्ये रोष असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपचे उमेदवार ‘देवा भाऊंच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाहीत,’ अशी टीकाही कराळे मास्तर यांनी केली आहे.

काय म्हणाले कराळे मास्तर?

“लोकांचा भाजपविरोधात रोष आहे. भाजपचा आमदार निवडून दिला, तर देवाभाऊंच्या विरोधात जाऊन आमचे प्रश्न तो विचारू शकत नाही, हे भाजपच्या लोकांना माहीत आहे. याबाबत अनेकदा त्यांच्या पक्षातील लोकांनीही तसे बोलून दाखवले आहे. काँग्रेसचा उमेदवार सहा वर्षे आमदार होता; पण एकाही विद्यार्थ्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही किंवा त्यासाठी आवाज उठवलेला नाही,” असे कराळे मास्तर यांनी म्हटले.

यामुळे पहिल्या फेरीत आपल्याला ४० ते ४५ हजार मते मिळतील आणि दुसऱ्या फेरीत विजय होईल, असा दावा त्यांनी केला आहे. या निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आणि ऐतिहासिक असेल. दुसऱ्या क्रमांकाची मते आपल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही कराळे मास्तर यांनी म्हटले आहे. तसेच, जवळपास ५० टक्के मतदारांचा कौल आपल्या बाजूने असेल, असाही दावा त्यांनी केला आहे.

Nagpur MLC Election Results; Nitesh Karale
Pune graduate constituency Results : पुण्यात पदवीधर मतमोजणी सुरू होताच खळबळ! सील नसलेल्या 8 मतपेट्या सापडल्याचा आरोप; महाविकास आघाडी आक्रमक

दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. ‘साम’च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजप कमबॅक करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा अंदाज काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांची चिंता वाढवणारा ठरू शकतो. मात्र, कराळे मास्तर यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या पराभवाची कारणे मांडत स्वतःच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आता प्रत्यक्ष निकालानंतरच कोणाचा विजय होणार, हे स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com