Mumabi News : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. त्यामध्ये नाशिक मतदारसंघातील निकाल धक्कदायक लागला आहे. या निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेल्या अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले आहेत. त्यांनी महायुतीमधील शिंदे यांच्या सेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायकरित्या पराभव केला आहे. 1972 च्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात असाच एक प्रकार घडला होता. माघार घेतल्याचे जाहीर केलेला उमेदवार निवडून आला होता. यामुळे नाशिकमध्ये त्याचीच पुनरावृत्ती घडली आहे. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून धास्तावलेलेल्या महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणच्या मतदारांना सहलीवर पाठवले होते. मात्र शेवटी ज्याची भीती होती तेच घडल्याने आता भाजप व शिवसेनेकडून या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे.
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत यापूर्वीच सहा जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित 11 जागांसाठी गुरुवारी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी सोमवारी पार पडली. त्यामध्ये महायुतीने दमदार कामगिरी करीत 11 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. तर नाशिक मतदारसंघात मात्र निकाल धक्कदायक लागला आहे. त्याठिकाणी भाजप (BJP) बंडखोर व अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या गोकुळ गीते यांनी बाजी मारली आहे त्यांनी महायुतीचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद मतदारसंघात महाविकास आघाडीचा प्रमुख उमेदवार रिंगणात नसल्याने सस्पेन्स वाढला होता. याठिकाणी महायुतीला विजयाची मोठी संधी होती. या मतदारसंघातील भाजपचे बंडखोर गोकूळ गीते यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले असले तरी मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम होते. 1972 च्या विधानसभा निवडणुकीत असाच एक प्रकार घडला होता. माघार घेतल्याचे जाहीर केलेला उमेदवार निवडून आला होता. यामुळे नाशिकमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. या प्रकारामुळे धास्तावलेलेल्या महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणच्या मतदारांना सहलीवर पाठवले होते. मात्र, ज्याची भीती होती तेच या मतदारसंघात घडले आहे. याठिकाणी बंडखोर गोकुळ गीतेंनी तब्बल 54 वर्षांनंतर चमत्कार घडवला असून अहिल्यानगरनंतर आता नाशिकची इतिहासात नोंद होणार आहे.
नाशिक मतदारसंघात मतदानापूर्वी मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत यांनी याठिकाणी ठाण मांडून बसले होते. मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत या दोन मंत्र्यांना नाशिकमध्ये तळ ठोकून बसावे लागले तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. त्यांच्या मध्यस्थीला यशही आल्याचे चित्र होते. त्यामुळे भाजपचे बंडखोर गोकूळ गीते यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. मात्र, त्यांचे मतपत्रिकेवर नाव कायम राहणार होते. त्यामुळे महायुतीची धाकधूक कमी होण्याऐवजी वाढली होती. त्या मागचे कारणही तसेच आहे. गीते यांनी यावेळी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असल्याचे जाहीर केले तरीही दराडे यांना पाठींबा असल्याचे जाहीर केलेले नव्हते. त्यामुळे याठिकाणी सस्पेन्स कायम होता.
1972 च्या विधानसभा निवडणुकीतही असाच एक प्रकार घडला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हा मतदारसंघ त्यावेळी राखीव होता. याठिकाणी काँग्रेसने (Congress) तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री बाबुराव भारस्कर हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षश्रेष्ठीने मंत्री भारस्कर यांना डावलून त्यांच्याऐवजी प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिली. उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या भारस्कर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर भारस्कर यांची काँग्रेसच्या हायकमांडने त्यांना मुंबईत बोलावले होते. यावेळी त्यांची समजूत काढली होती. चर्चेअंती भारस्कर यांनी माघार घेण्याची घोषणा केली. त्यांनी उमेदवारी मागे घेणार असल्याचे जाहीर केले.
त्याकाळात आताप्रमाणे सहजपणे हेलिकाॅप्टर उपलब्ध होत नव्हते. त्यासोबतच रस्ते प्रवासही आतासारखा सोपा नव्हता. भारस्कर हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ठरलेल्या वेळात मतदारसंघात पोहचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना ठरलेल्या मुदतीत उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. त्यामुळे मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता. त्यावेळी यावर मार्ग काढत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिंदे यांच्यासोबत भारस्कर यांनी त्यांचा प्रचार केला. जाहीर सभांमधून व गावोगावी जाऊन त्यांनी शिंदे हे अधीकृत उमेदवार आहेत, त्यांना मते देण्याचे आवाहन केले.
त्याकाळी काँग्रेस उमेदवाराला फारसे आव्हानही नव्हते. त्यामुळे ही निवडणूक शिंदे एकतर्फी जिंकतील, असे सर्वानाच वाटत होते. मात्र, त्यावेळी मतदारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतलेल्या भारस्कर यांनाच मते दिली. मतमोजणीत अपक्ष बाबुराव भारस्कर यांना १९ हजार ८५३ तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रभाकर शिंदे यांना १५ हजार १९२ मते मिळाली. निवडणूक रिंगणातून माघार घेतलेले पण मतदान पत्रिकेवर नाव कायम राहिलेले भारस्कर हे ४ हजार ६६१ मतांनी विजयी झाले अन् कोणाच्याही ध्यानी मनी नसताना श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार झाले.
नाशिक विधान परिषद मतदारसंघात भाजपचे बंडखोर गोकूळ गीते यांनी अखेर माघार घेत असल्याचे जाहीर केले असले तरी मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम होते. यामुळे नाशिकमध्ये श्रीगोंदा येथील निकालाची पुनरावृत्ती पाहवयास मिळाली. नाशिक मतदारसंघातील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना ठाणे येथे सहलीवर पाठवले होते. मात्र, मतमोजणीनंतर धक्कादायक निकाल नाशिकमध्ये समोर आला आहे.
मतमोजणींनंतर अपक्ष गोकुळ गीते यांना 358 मते मिळाली तर महायुतीचे नरेंद्र दराडे यांना 247 मते मिळाली. त्यामुळे महायुतीची विशेषत: भाजपची मते फुटली यावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर दुसरीकडे गीते यांना महाविकास आघाडीने पाठींबा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे मतदान त्यांच्या पारड्यात जाणार हे निश्चित होते. मात्र, दुसरीकडे महायुतीचे मते देखील गीते यांना मिळाली. त्यामुळे गीते यांनी 111 मतांनी विजय मिळवत तब्बल 54 वर्षांनंतर चमत्कार घडवला असून श्रीगोंदानंतर आता नाशिकची इतिहासात नोंद होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.