

NCERT : देशात सध्या शालेय पुस्तकांमधून अनेक शास्त्रज्ञ, त्यांचे शोध तसंच आत्तापर्यंतच्या संशोधनातील जागतिक मान्यताप्राप्त थेअरीज बदलण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे. त्यातच आता इतिहास पुसण्याचा उद्योगही सुरु करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे केवळ महाराष्ट्राचच नव्हे तर अवघ्या भारताचं भूषण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या मराठा समाज्राच्या इतिहास पाठ्यपुस्तकातून पुसण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. इयत्ता ८वीच्या NCERT च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे.
इयत्ता ८ वीच्या NCERTच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा जो विस्तार झालेला होता. यामध्ये महाराष्ट्रासह राजस्थान आणि उत्तर भारतातल्या मोठ्या भूभागाचा समावेश आहे. पण या पुस्तकात राज्सथानातील जयपूर, जोधपूर आणि उदयपूर इथल्या प्रमुख सत्ता मराठ्यांच्या अधिपत्याखाली होत्या. या ठिकाणांहून त्यावेळी चौथी आणि देशमुखी सारखे करही वसूल केले जात होते, याची ऐतिहासिक पुरावे आहेत. पण तरीही केवळ राजकीय दबावापोटी मराठा साम्राज्याच्या या विस्तारातून राजस्थानातील भाग वगळून तो पुस्तकात छापण्यात आला आहे. त्यामुळं राजस्थानातील राजपुताना घराण्यांच्या दबावापोटी हा नकाशा काढण्यात आल्याचा आरोप नागपूरचे मुधोजी भोसले यांनी केला आहे.
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना मुधोजी भोसले म्हणतात, महाराष्ट्राचा तेजस्वी मराठा इतिहासाची गळचेपी सुरु असून मराठा साम्राज्याच्या ध्वज पुस्तकाचा कागदावरच नाही तर तो या मातीच्या कणाकणात आहे. त्यामुळं राजस्थानसह मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा नकाशा ‘जसाच्या तसा’ पु्स्तकात छापावा. मराठ्यांचा साम्राज्याचा विस्तार हा अटक ते कटकपर्यंत होता. राजस्थानमधून गेल्याशिवाय हा भूभाग कटकपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं राजस्थानच नाही तर बंगालचा भागही मराठा साम्राज्याचा होता त्याचाही समावेश पुस्तकांमध्ये करावा. राजपुताना घराण्यांनी कुठेतरी मुघलांसोबत केलेला व्यवहार चालतो, मात्र मराठ्यांचं राज्य का चालत नाही असा सवालही मुधोजी भोसले यांनी केला आहे. जर राजपूत घराणं एकत्र येऊन अशा पद्धतीची कृती करत असेल, तर आम्ही मराठी लोक एकत्र येऊन तीव्र आंदोलन करू. हे आंदोलन कशा पद्धतीचं असेल हे आम्ही आता सांगणार नाही, असा इशाराही यावेळी मुधोजी भोसले यांनी साम टिव्हीशी बोलताना दिला.
दरम्यान, मुधोजी भोसले यांनी शाळेच्या पुस्तकातून मराठ्यांचा इतिहास वगळल्याचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं तक्रार केली आहे. तसंच अधिवेशन सुरू असल्यानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी लिहलं आहे. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच एनसीआरटीला सुद्धा या संदर्भात पत्र पाठवत त्यांनी तीव्र निषेध नोंदवला. महाराष्ट्र सरकारनं महराष्ट्राची अस्मिता म्हणून ठोस भूमिका मांडून केंद्र आणि NCERTकडं या विषयाचा पाठपुरावा करावा. इतिहास वळवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, मराठ्यांचा इतिहास हा देशाचा कणा आहे. तो वाकवण्याचा प्रयत्न करू नये, तातडीनं याची दखल महाराष्ट्र सरकारनं घ्यावी आणि पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी यावेळी मुधोजी भोसले यांनी केली आहे.