

ST Employees Diwali Bonus: दिवाळी सणाला आता उद्यापासून सुरु होत असून नागरिकांची यानिमित्त खरेदीसाठी लगबग सुरु आहे. रोजगारानिमित्त घरापासून दूर शहरात असलेले गावातील लोक आता एसटीनं गावी परतू लागले आहेत. दिवाळीच्या सणाच्या काळात लोकांना सेवा देणारे एसटीचे कर्मचारी मात्र अद्याप बोनसपासून वंचित होते. पण आता एसटी महामंडळानं त्यांना दिलासा दिला असून १०,००० रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची दिवाळी गोड होणार आहे.
परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत बोनसची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, एसटी महामंडळाच्या बोनस बाबत आणि इतर मागण्यांवर सरकारसोबत चर्चा झाली. या बैठकीत सध्या बोनसबाबत निर्णय घेण्यात आला पण कर्मचाऱ्यांच्या उर्वरित प्रश्नांवर दिवाळीनंतर मार्ग काढण्याचं ठरलं आहे.
दरम्यान, गरजू कर्मचाऱ्यांना २२ हजार रुपये अग्रीम उचल म्हणूनही देण्यात येणार आहेत. हे उचलीचे पैसे त्यांच्या पगारातून नंतर वळते केले जातील. यासाठी दर महिन्याला एसटी महामंडळाला ५ कोटी रुपये द्यावे लागतील. त्यानुसार एकूण १०५ कोटी आसपास एसटी महामंडळाला द्यावे लागणार आहेत.
"कामगार सुखी झाला तर महामंडळ पुढे जाईल, असं सांगताना एकनाथ शिंदेंनी सूचना केल्या होत्या की, कामगारांची दिवाळी चांगली करावी. कंत्राटी कामगारांनी बैठकीत आश्वासन दिलं आहे की, ऐन दिवाळीत संप पुकारुन ते प्रवाशांना वेठीस धरणार नाही. संपाचा निर्णय वारंवार घेणं योग्य नाही चर्चेतून प्रश्न सुटतात. एसटी कामगारांच्या मागे महायुती ठामपणे उभी आहे. दरवर्षी अशा परिस्थितीत खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा पैसे आकारले जातात. याबाबत कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत, असंही सरनाईक यांनी सांगितलं.
परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की, चालकांची भरती करावी असा प्रस्ताव आम्ही शासनाकडं दिलेला आहे. मात्र, शासनाने तो ना मंजूर केला. त्यामुळं तात्पुरती चालक भरती आम्ही करत आहोत. मात्र, चालक भरतीबाबत कायमस्वरूपी भरती व्हावी याबाबतचा प्रस्ताव आम्ही पुन्हा शासनाकडे देणार आहोत. एसटीच्या सुलभ शौचालयाच्या स्वच्छतेबाबतही सूचना दिलेल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.