Mumbai News : दिल्लीत चार दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच दिवशी राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काही खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा प्रसार माध्यमात रंगली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभर शिवसेना ऑपरेशन टायगर राबविणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसापासून रंगली आहे. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्त्रे व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.
राज्यात ऑपरेशन टायगरबाबत चर्चा सुरु असतानाच याच विषयावरून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असताना ऑपरेशन टायगरवर भाष्य केले. गेल्या काही दिवसापासून आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे तेव्हा करूच. त्याबाबत एकनाथ शिंदे ठरवणार असून तेच निर्णय घेतील, असे मोठे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे.
शिरसाट म्हणाले, 'आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर करत नाही. पण ज्यांना यायचे त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. ऑपरेशन टायगर करण्याची आता आमची मानसिकता नाही. मात्र, जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे, तेव्हा एकनाथ शिंदे ठरवतील. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. काही महिन्यात हे सर्व एकत्र राहतील, असे वाटत नाही.
मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यात येत आहे, त्यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं. प्रताप सरनाईक यांनी ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी काही वेळ दिला होता. अनेक राज्यात त्या त्या राज्याची भाषा बोलली जाते. मग मुंबईत मराठी का नाही? एवढे करूनही ऐकत नसतील तर ही मुजोरी म्हणावी लागेल. मग कारवाई होईलच, असं शिरसाट म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शिर्डीचे ठाकरेंचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना माध्यम प्रतिनिधींनी या विषयी प्रश्न विचारला. मात्र, हात जोडत ते म्हणाले, यावर प्रश्न विचारू नका. ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ असे म्हटले. या चर्चांचे त्यांनी खंडन न करता सूचक मौन बाळगले आहे.
दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार कोणीही कुठे जाणार नाही. ज्यांना जायचे होते ते आधीच गेले आहेत. आता सर्व खासदार पक्षासोबत भक्कमपणे उभे आहेत. उद्धव ठाकरेंचे खासदार फुटणार आहेत, भाजपच्या संपर्कात आहेत, अशा बातम्या पसरवल्या जाणार आहेत, या हे सर्व अफवा आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.