

Maharashtra Politics : राज्याच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरने भूकंप आणला असून ठाकरेंच्या शिवसेनेचे सात खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी केला होता. तर आमदार अंबादास दानवे यांनी, आमचे काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचे सांगितले. यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी देखील यामागचे कारणच सांगत खळबळ उडवून दिली. या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर आपल्या खासदारांची बैठक घेणार आहेत.
आता या बैठकीला कोण-कोण उपस्थित राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहे. फडणवीस यांनी पुण्यातील ठाकरेंच्या बड्या नेत्याला थेट प्रपोजल दिल्याचे म्हटलं आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली असून शिवसेनेच्या नेत्यांचे एका मागून एक अशी वक्तव्य समोर येत आहे. त्यात कबूली देणारी वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेकडून येताना दिसत आहेत. यामुळे शिवसेनेकडे आता ठाकरेंच्या खासदारांचा कल आहे की काय? पुन्हा शिवसेना फुटणार की काय? यासह ठाकरेंचे सात खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? असे सवाल आता उपस्थित होताना दिसत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी उद्याच (ता.१४) मातोश्रीवर आपल्या खासदारांची तातडीने बैठक बोलावली आहे. यामुळेच सध्या पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चेनं चांगलाच जोर धरला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचक वक्तव्याने राज्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे राजकारण ढवळून सोडले आहे.
फडणवीस हे पुण्यातील श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे कामाची पहाणी करत होते. याच वेळी तेथे राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आले. त्यांच्यासोबत ठाकरेंचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार बाबाजी काळे होते. यावेळी वळसे पाटील यांनी फडणवीसांकडे काळे यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला. हाच क्षण आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला आहे.
तर या भेटीत फडणवीस यांनी मिश्कील टिपण्णी करत, फोटोची गरज नाही. आम्ही बाबाजींना एक प्रपोजल दिलं आहे, असे वक्तव्य केलं आहे. याच एका वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भूवया उंचावल्या असून नेमकं प्रपोजल कसलं अशा चर्चा होताना दिसत आहेत. तसेच या मागे काही हालाचाली तर नाही ना अशी शंकेची पाल चुकचुकत असून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.