

Mumbai News : धाराशिवचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे वडील पवन राजेनिंबाळकर व त्यांचे चालक समद काझी यांची कळंबोली नजीक 20 जून 2006 रोजी हत्या करण्यात आली होती. या घटनेला जवळपास वीस वर्ष झाली आहेत. या गाजलेल्या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप आहेत. या हत्याकांडाचा निकाल 14 मे 2026 रोजी लागणार होता. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, आजच्या सुनावणीवेळी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने या प्रकरणाची पुढील तारीख 16 जून निश्चित केली आहे. तब्बल दोन दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पवन राजेनिंबाळकर आणि चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल गुरुवारी जाहीर होणार होता. मात्र, हा निकाल आता लांबणीवर पडला आहे. या प्रकरणाची पुढील तारीख 16 जून निश्चित केली आहे. त्यामुळे आता या निकालासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
निकाल लांबणीवर पडण्याचे नेमके कारण आले समोर
मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टात गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीवेळी या प्रकरणातील महत्त्वाच्या 9 आरोपींपैकी डॉ. पद्मसिंह पाटील, मोहन शुक्ला हे दोघेजण वैद्यकीय कारणास्तव न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. संबंधित आरोपींच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण देत न्यायालयाकडे पुढची तारीख देण्याची विनंती केली होती. न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ही विनंती मान्य करत निकालाची प्रक्रिया 16 जूनपर्यंत पुढे ढकलली असल्याचे समजते.
न्यायाधीश नावंदर यांनी निकालाची पुढील तारीख जाहीर करतानाच न्यायालयाने सर्व आरोपींना कडक शब्दात ताकीद दिली आहे. 16 जून रोजी होणाऱ्या सुनावणीला माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (Padmsinh Patil) यांच्यासह सर्व 9 आरोपींनी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहणे अनिवार्य असल्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.
दरम्यान, मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश नावंदर यांच्या कोर्टात यापूर्वी 20 एप्रिलला झालेल्या सुनावणीला डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सात आरोपी हजर होते. त्यावेळी या हत्याकांडाचा निकाल 14 मे 2026 रोजी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे निकालाविषयी उत्सुकता लागली होती.
2006 मध्ये झालेल्या या दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यात आतापर्यंत सीबीआय, महाराष्ट्र पोलीस आणि सीआयडी अशा यंत्रणांनी तपास केला असून 128 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने 16 जूनला न्यायालय काय निकाल देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.