

Mumbai News : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंडे साहेबांच्या मृत्यूबाबत काही वेगळी माहिती असेल तर त्यांनी द्यावी. त्याचा तपास केला जाईल,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडले नसल्याचे म्हटले होते. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मुंडे यांना लोकसभेच्या सभागृहात एकदाही मंत्री म्हणून काम करता आले नाही. आदल्या रात्रीपर्यंत बोलणे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी येणे, याचा संदर्भ देत ठाकरे यांनी त्यांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली होती.
‘वेगळी माहिती असेल तर द्या, चौकशी होईल’
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मुंडे साहेबांच्या मृत्यूबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर त्यांनी द्यावी. त्याचा तपास केला जाईल. याप्रकरणी मी मागणी केली होती. त्यावेळी चौकशी झाली होती. मुंडे साहेबांबाबत काही वेगळे झाले असे मला कुटुंब म्हणून वाटत नाही.”
दिशा सालियन प्रकरणावरही पंकजा मुंडेंची भूमिका
यावेळी पंकजा मुंडे यांनी दिशा सालियन प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “दोन्ही विषय गंभीर आहेत. त्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. चौकशी यंत्रणा योग्य निर्णय घेतील, तोपर्यंत आपण निकाल लावू नये. तपास यंत्रणेबाबत काही टिप्पणी करू नये, तशा मुख्यमंत्र्यांनीही सूचना दिल्या आहेत” असे त्या म्हणाल्या.
‘मंत्री काजू-बदाम खाण्यासाठी गेले नव्हते’
नांदेड येथे दुष्काळ आढाव्याची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. नेते, अधिकाऱ्यांच्या या बैठकीसाठी काजू-बदाम असा नाश्ता ठेवला होता. परभणीचे खासदार संजय जाधव हा नाश्ता करताना दिसून येताच त्यांच्यावर बरीच टीका झाली. यावरही "बैठकीला गेलेले मंत्री काजू-बदाम खाण्यासाठी गेले नव्हते,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
‘मी निवृत्तीबाबत बोलत नव्हते’
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्या निवृत्तीच्या चर्चेवरही पुन्हा स्पष्टीकरण दिले. २४ वर्षे मी काम करत आहे. तेच रस्ते, तेच पीए आहेत. मी योग्य वेळीच निवृत्त होईल. आता त्याची गरज नाही. माझे काम संपले असे मला वाटत नाही,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.