Solapur, 24 August : सोलापूर जिल्ह्यात माढ्यानंतर पंढरपूर-मंगळवेढ्यातून महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक रस्सीखेच दिसून येत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पंढरपूरमधून इच्छुक असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनीही पवारांची पुण्यात जाऊन भेट घेतली. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून तुतारीचा उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) हे लवकरच पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पक्षाचा मेळावा घेणार असल्याची माहिती आहे. त्या दौऱ्यातच पंढरपूर (Pandharpur) विधानसभेची रणनीती आणि पुढचा उमेदवार कोण, हेही स्पष्ट होणार आहे.
शिवसेना नेते तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी आज सकाळी पुण्यातील मोदी बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. ते पंढरपूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांचा भैरवनाथ शुगर हा साखर कारखाना मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथे आहे.
या कारखान्याच्या माध्यमातून अनिल सावंत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात कार्यरत असतात. त्यामुळे अनिल सावंत यांनी पंढरपूरमूधन उमेदवारी मिळावी, यासाठी शरद पवार यांची भेट घेतली आहे.
शिवाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी आज शरद पवारांची भेट घेताच भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि गणेश पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. विधानसभेची आगामी निवडणूक आपण लढवणार असून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी भगीरथ भालके हे प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी पत्नी माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या उमेदवारीसाठी जयंत पाटील यांची भेट घेतली. भोसले हे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या भेटीमुळे पंढरपूरची उमेदवारी हा सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी : भगीरथ भालके
आगामी विधानसभेची निवडणूक मी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून लढवणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आणि संपूर्ण सोलापूर जिल्हाला हे सर्व माहिती आहे. त्या संदर्भातची माहिती शरद पवारांना दिली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी, अशी माझी मागणी आहे.
लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून काम केले आहे. आमच्या मतदारसंघातून आणि आमच्या भागातून आघाडी देण्याची भूमिका आम्ही पार पाडली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून आम्हाला उमेदवारी मिळावी, अशी आमची मागणी आहे. त्याबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते सकारात्मक विचार करतील, असा आम्हाला विश्वास आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.