
Sangli News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यात सध्या महाविकास आघाडीत कोणतीच तयारी होताना दिसत नाही. पण आता सांगलीमध्ये काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी महापालिका व बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रणनीती आणखताना बैठका घेणं सुरू केलं आहे. तसेच त्यांनी काही बंडखोर आणि निलंबितांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस तयारी करत आहे. यासाठी कडेगाव येथे सोनहिरा साखर कारखान्याच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी बाजार समितीचे संचालक, महापालिकेच्या विसर्जित सभागृहातील काँग्रेसचे माजी नगरसेवकांसह काही नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत मात्र बैठकीस उपस्थित नसल्याने कुजबूज सुरू झाली होती. पण याच बैठकीला काँग्रेसमधून निलंबित केलल्या नेत्या जयश्री पाटील उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली होती. यांच्या या बंडखोरीमुळे पृथ्वीराज पाटील यांचा परभाव झाल्याची टीका अनेकांनी केली होती. तर पक्षाविरोधात काम केल्याने जयश्री पाटील यांच्यावर निलंबणाची कारवाई करत ‘बंडखोरांना पक्षात पुन्हा थारा नाही,’ असा संदेश दिला होता.
मात्र आता त्याच बंडखोर जयश्री पाटील यांनी समर्थकांसह बैठकीस उपस्थिती लावल्याने अनेकांच्या नेमकं हे काय होतयं असा सवाल उपस्थित झाला. तर मतदारांच्या बोटावरची शाई वाळण्याआधीच पाटील यांच्यासारख्या बंडखोरांचे पुन्हा एकदा पक्षात पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना आढावा बैठक घेण्यात आली. यासाठी प्रमुख कार्यकर्ते, माजी नगरसेवकांची ही बैठक बोलावली होती. यावेळी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढण्याचे आवाहन आमदार कदम यांनी केले.
आमदार कमद यांनी बैठक घेतली खरी मात्र या बैठकील उपस्थित असणाऱ्या जयश्री पाटील यांच्यावरून आता प्रश्न उपस्थित केले जातायत. श्रीमती पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असतानाही त्या येथे कशा? की त्या कदम यांच्या समर्थक असल्याने येथे आल्या. त्यातच शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि सभागृह गटनेते संजय मेंढे बैठकीला उपस्थित न राहिल्याने आता बैठक काँग्रेसची की कदम यांच्या समर्थकांची असेही बोलले जात आहे.
विधानसभे वेळी जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या या भूमीकेमुळं पृथ्वीराज पाटील यांचा परभाव झालाच शिवाय त्यांचे निलंबणही झाले. यानंतर जयश्री पाटील ‘राष्ट्रवादी’च्या (अजित पवार गट) वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र याच दरम्यान त्यांनी कदम यांच्या बैठकीला उपस्थित लावल्याने आता चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
जयश्री पाटील यांनी आपण निलंबित असलो तरी काँग्रेससमवेत राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच यांच्या या निर्णयाला त्यांच्या समर्थकांचाही पाठिंबा आहे. दरम्यान नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचा संकल्पाची ही एक कडी मानली जात आहे. याच कडीतून बंडखोरांना पुन्हा पक्षात घेण्याचे प्रयत्न काँग्रेस करताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.