

Solapur, 06 January : महापालिका निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांची मोडतोड झाली आहे. मातब्बरांच्या पक्षांतरामुळे काही पक्ष गलितगात्र झाले आहेत. ते नव्या जोमाने पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत. सोलापुरातील एमआयएमचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दी यांनी महापालिका निवडणुकीच्या धामधूमीत पक्ष सोडला, त्यामुळे एमआयएमचं कसं होणार, असा प्रश्न असतानाच डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी सोलापूरच्या मैदानात उतरले आहेत.
सोलापूर (Solapur) महापालिकेची निवडणूक जाहीर होताच अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अनेकांनी रात्री इतर पक्षांत उड्या मारल्या, त्यामुळे नेमकं कोण कोणत्या पक्षात आहे, असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला होता. उमेदवारी निश्चितीनंतर हे राजकीय उड्या मारण्याचा प्रकार बंद झाला. पण मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्षांतरामुळे सोलापुरात नेमकं काय सुरू आहे, हे कोणालाच समजत नव्हतं.
काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या फिरदोस पटेल यांनी ऐनवेळी ती उमेदवारी नाकारत एमआयएममध्ये (Amim) जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण एमआयएम पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. शाब्दी हे ओवैसी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. पण त्यांनी पक्ष का सोडला, याचा उलगडा अजूनही झालेला नाही.
ओवैसी यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शाब्दी यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्यासाठी ओवैसी यांनी सोलापुरात सभाही घेतली होती. पण त्याच शाब्दी यांनी एमआयएम सोडल्याने अनेकांना आर्श्चयाचा धक्का बसला होता. पण, शाब्दी यांनी पक्ष सोडल्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खुद्द ओवैसी सोलापूरच्या मैदानात उतरले आहेत.
सोलापूर महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत एमआयएमचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यावेळी एमआयएम एकसंघ होता. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तौफिक शेख यांनी सहा नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तौफिक शेख यांनी साथ सोडताच पक्षाची धुरा ओवैसी यांनी शाब्दीच्या खांद्यावर दिली होती. त्यांनी विधानसभेला भाजपला चांगली टक्कर देत तब्बल ६१ हजार मते घेतली होती. पण शहराध्यक्षांच्या निवडीवरून तसेच उमेदवार ठरविण्यावरून शाब्दी यांचे पक्षांतर्गत मतभेद झाले होते. तोच पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी खुद्द पक्षाध्यक्ष ओवैसी हे सोलापूरमध्ये दाखल झाले आहेत.
असदुद्दीन ओवैसी हे आपल्या भाषणातून पक्ष सोडून गेलेले फारूक शाब्दी आणि तौफिक शेख यांच्यावर काय भाष्य करतात, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे. पडझड झालेला एमआयएम पक्ष मागील निवडणुकीत जिंकलेल्या नऊ जागा पुन्हा जिंकणार का, त्यासाठी पक्षाकडून कसे नियोजन केले जात, याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.