Jayant Patil Reply to Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडणुकीद्वारे निवडून आलेलो आहे. मी निवडून आल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनीच मला पत्र दिले होते. माझ्या नियुक्तीनंतरच महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांना माझ्या सहीनेच एबी फॉर्म देण्यात आले. जर माझी नियुक्ती बेकायदेशीर असेल, तर महाराष्ट्रातून सगळे निवडून आलेले आमदारही बेकायदेशीर ठरविण्याचा काहीतरी डाव दिसतोय, असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला. (Jayant Patil's reply to Ajitdada group's objection in Election Commission....)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची झालेली नियुक्ती बेकायदेशीर आहे. कारण त्यांची निवड राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आधीच आणि राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्याआधीच करण्यात आलेली आहे, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या सुनावणीदरम्यान करण्यात आला होता. त्याला जयंत पाटील यांनी सोलापुरातून उत्तर दिले.
जयंत पाटील म्हणाले की, संख्याबळाबाबत आमचे वकील युक्तिवाद करतील. कालच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली आहे, त्यामध्ये २४ राज्यांपेक्षा जास्त अध्यक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. पहिल्यांदा ही जेव्हा घटना झाली, तेव्हाही या २४ लोकांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. पण त्यानंतर अजित पवार गटाने जर कोणाला नियुक्ती दिली असेल आणि त्यांचे त्यांना समर्थन असेल, निवडणूक आयोगाने पूर्वी अध्यक्ष कोण होते, हे विचारून घेऊन निर्णय द्यावा.
पंचवीस वर्षे तुम्ही पवार यांच्यासोबत काम केलं. पंचवीस वर्षांनतर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली असेल, तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे, इतक्या उशिरा का लक्षात आले? पक्षांतर्गत निवडणुका ज्यावेळी झाल्या, त्यावेळेस असा प्रश्न कोणी विचारला नाही, असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह गोठवण्याचा प्रश्न येत नाही. कारण पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांचे आहे. एखाद्याने उद्या भाजपच्या चिन्हाबद्दल प्रश्न उपस्थित केला तर ते तुम्ही गोठविणार का? शरद पवार हे पक्षाचे संस्थापक आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली चालवलेल्या पक्षाला आतापर्यंत कोणीही चॅलेंज केलेले नाही. त्यांना सर्वांनी सर्वाधिकार दिलेले होते, हात उंचावून, त्याच्या क्लिप सर्वांकडे आहेत. त्यामुळे चिन्ह गोठविणे हे अन्यायकारक होईल. चिन्ह गोठविण्याची एक पद्धत आहे, पण चिन्ह गोठवू नका, अशी मागणी आम्ही केलेली आहे.
शरद पवार यांच्या कार्यशैलीतच हे लोक मोठे झाले आहेत. तीच लोकं आता पवारसाहेबांना प्रश्न विचारत आहेत. घरातला लहान मुलगा जेव्हा मोठा होतो आणि त्याला स्वतंत्र व्हायचं असतं, तेव्हा तो स्वतःचं घर बांधतो. तो घरातून वडिलांना काढत नाही, यातच सगळं आले, असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.