
Solapur, 20 March : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विश्वतेजसिंह आणि शिवांशिका यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामात नुकताच अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे पार पडला. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुलाच्या विवाह सोहळ्याची पत्रिका भाजप हायकमांडासह महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिली हेाती.
अकलूजमधील विवाह सोहळ्याला केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच हजेरी लावली होती. अकलूजला येण्याचं टाळलेल्या भाजप नेत्यांनी मुंबईतील स्वागत समारंभाला (रिसेप्शन) मात्र आजर्वून उपस्थिती लावली. एवढंच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शुभेच्छा संदेशही पाठविला आहे, त्यामुळे मध्यंतरी उठलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नातू आणि भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitshinh Mohite Patil) यांचे चिरंजीव विश्वतेजसिंह यांचा विवाह वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील उदयसिंह सरनाईक यांची कन्या शिवांशिका यांच्याशी नुकताच झाला. या विवाह सोहळ्याची पत्रिका आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या हायकमांडपासून सर्वांना दिली होती. त्यात राज्यातील नेत्यांचाही समावेश होता. तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही त्यांनी आवर्जून बोलावले होते.
अकलूज येथील विवाह सोहळ्याला महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज, माजी मंत्री महादेव जानकर, हर्षवर्धन पाटील यांच्यासह क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही हजेरी लावली होती. विशेष म्हणजे निमंत्रण देऊनही अकलूजच्या विवाह सोहळ्याकडे भाजप नेत्यांनी (BJP Leader) पाठ फिरवली होती. त्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात चांगली रंगली हेाती.
विश्वतेजसिंह आणि शिवांशिका यांच्या विवाह सोहळ्याचे रेसिप्शन मोहिते पाटील यांनी मुंबईत ठेवले होते. त्या रेसिप्शनला मात्र भाजपचे महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, आमदार परिणय फुके यांनी हजेरी लावली होती. यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शुभेच्छा संदेश पाठविला आहे.
स्वागत समारंभाला भाजप नेत्याबरोबरच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री छगन भुजबळ, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार संजय पाटील, आमदार रोहित पवार, दिग्दर्शक बोनी कपूर, अभिनेते रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आदी उपस्थित होते.
एकीकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात यावे, यासाठी आग्रह होत असताना खुद्द मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीच स्वागत समारंभाला हजेरी लावली आहे, त्यामुळे मोहिते पाटील यांना अभय असल्याचे मानले जात आहे. तसेच पक्षांतर्गत विरोधकांना इशारा असल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.