Satara Politic's : शंभूराज देसाईंचे आता थेट पृथ्वीराजबाबांनाच चॅलेंज; म्हणाले ‘मी महायुतीकडून येतो, तुम्ही....’
Karad, 11 July : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीच आव्हान दिले आहे. विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. त्यावरून आता महायुतीकडून मी समोरासमोर येऊन चर्चा करायला तयार आहे, पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीकडून यावं, असं आव्हान शंभूराज देसाई यांनी दिले आहे. त्यामुळे आता पृथ्वीराजबाबा शंभूराज देसाईंचे आव्हान स्वीकारतात, हे पाहावे लागणार आहे.
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे मुंबईहून विमानाने थेट कऱ्हाड (जि.सातारा) येथील विमानतळावर आले. कराडहून दौलतनगरला (ता. पाटण) रवाना होण्यापूर्वी देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनाच समोरासमोर येऊन चर्चा करण्यासाठी येण्याचे आव्हान दिले आहे. या वेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, विजय वाटेगावकर, रणजीत पाटील, सुलोचना पवार आदी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे जे दहा ते बारा आमदार निवडून आले आहेत, त्यात कोणताही घोटाळा झाला नाही आणि महायुतीचे जे दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत, त्यात घोटाळा झाला, असे म्हणणे चुकीचे आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त यंत्रणा आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी तसा आरोप केला असेल तर मी समोरासमोर येऊन चर्चा करायला तयार आहे, पृथ्वीराजबाबांनी महाविकास आघाडीच्या वतीने चर्चेसाठी यावे.
विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान आणि वाढलेल्या टक्केवारीच्या मुद्यावरून चव्हाण यांनी निवडणूक आयोगाची प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता, त्यावर मंत्री देसाई म्हणाले की, माझ्या पाटण मतदार संघातील अनेक मतदार मुंबईवरून आले होते. त्यांना मुंबईहून यायला उशीर झाला होता, त्यामुळे मतदानासाठी रांगा लागल्या होत्या, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. पण, शेवटच्या तासात मतदानाची आकडेवारी वाढली म्हणजे ती बोगस मतदान झाले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असा दावा देसाई यांनी केला.
आमदार गायकवाड यांनी मारहाण करणे चुकीचे
आमदार निवासमध्ये राहायला असताना मीही तेथील जेवणाच्या दर्जाबाबात तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीनंतर जेवणाच्या दर्जात सुधारणा व्हायलाच पाहिजे. आमदारांनी केलेल्या तक्रारींमध्ये तथ्य आहेच. आमदार गायकवाड यांनीही तशी तक्रार करायला हवी होती. मात्र, मारहाण करणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी गायकवाड यांच्या मारहाणीच्या कृत्यावर व्यक्त केले.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण एकमेकांना जोडण्यासाठी कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्ग होण्याची मोठी गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्या संदर्भात चर्चा करुन, त्या रेल्वेमार्गासाठी आग्रह धरण्यात येईल, असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.