

Karad, 01 February (अमोल जाधव) : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विंग, कार्वे, काले, येळगाव व सैदापूर जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचा पंजा(पक्षचिन्ह) निवडणुकीतून गायब झाले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या कऱ्हाड दक्षिणेतील पक्षाची पडझड आणि मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह आता पाच जिल्हा परिषद गटांत नसणे, यामुळे काँग्रेसचे अस्तित्व आता शेवटची घटका मोजत असल्याचे दर्शविणारी आहे.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कऱ्हाड ही कर्मभूमी. याच कऱ्हाडच्या राजकीय पटलावर २०२४ पर्यंत काँग्रेसचा (Congress) दबदबा राहिला आहे. ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते, माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर आणि नंतरच्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या पहिल्या निवडणुकीतील यशवंतराव मोहिते यांचा शेतकरी कामगार पक्षातून विजय झाला. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कऱ्हाड (karad)या मतदारसंघात काँग्रेसचे वारे वाहू लागले. हे वारे २०२४ पर्यंत कायम राहिले होते.
विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपच्या डाॅ. अतुल भोसले यांनी पराभव केला. त्यामुळे काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला ढासळला. त्यानंतर गेल्या दीड वर्षात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले.
काँग्रेसचे मनोहर शिंदे, पहिलवान नानासाहेब पाटील, जयवंतराव जगताप, शंकरराव खबाले, ॲड. नरेंद्र नांगरे- पाटील यांच्यासह अनेक शिलेदारांनी काँग्रेसचा हात सोडला. काँग्रेस पक्षातील ही पडझड पक्षनेतृत्वाला चिंतन करायला लावणारी आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विंग, काले, कार्वे, सैदापूर, येळगाव गटात पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने हाताचा पंजा हे चिन्ह निवडणुकीतून गायब झाले आहे. गेल्या निवडणुकीत काले, कार्वे वगळता विंग, येळगाव गटात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. ॲड. उंडाळकर हे येळगाव गटाचे काँग्रेसचे झेडपी सदस्य होते. यावेळच्या निवडणुकीत कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात समाविष्ट असणाऱ्या गटांपैकी पाच गटात हाताचा पंजा या चिन्हावर एकही उमेदवार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उत्तरेतही केवळ दाेघेच रिंगणात
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात उंब्रज गटातील तळबीड पंचायत समिती गणातून संग्राम पवार, मसूर गटातील वडोली भिकेश्वर गणातून प्रियांका पवार हे उमेदवार सोडल्यास काँग्रेसचा उमेदवार कुठेही रिंगणात नसल्याने पक्षाच्या या अवस्था चिंतनीय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.