महेश पाटील
Mangalvedha News : गेली अनेक वर्षांपासून हक्काच्या पाण्यासाठी मंगळवेढ्यातील गावे सरकारशी भांडत होती. पण, राज्यात ज्यांनी सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली, त्या आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवून आघाडी सरकारने जे पाप केले आहे, ते पाप मंगळवेढ्यात माझ्या माध्यमातून भाजपचा आमदार झाल्याबरोबरच 19 गावची उपसा सिंचन योजना असो अथवा 24 गावची उपसा सिंचन योजना, या दोन्ही योजना मार्गी लावून ते पाप धुण्याचे काम मी केले आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. (Devendra Fadnavis' words will come true: Samadhan Avtade)
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील 19 गावच्या पाणी प्रश्नासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत आमदार समाधान आवताडे बोलत होते. पिढ्यान्पिढ्यांच्या संघर्षातून म्हैसाळ योजने पाणी मंगळवेढ्यातील 19 गावांमध्ये आले आहे. पण पाण्याचे ‘टेल टू हेड’ योग्य वाटप करा आणि माझ्या मतदारसंघातील लाभपट्ट्यातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवा, अशी सूचना आमदार आवताडे यांनी म्हैसाळच्या अधिकाऱ्यांना केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंगळवेढा तालुक्यातील 19 गावांमधील 6 हजार हेक्टर क्षेत्रावर म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे. पण, पाण्याच्या वाटपात दुजाभाव होत आहे. अधिकारी पाणीवाटपात पक्षपातीपणा करीत आहेत, असा आरोप शेतकरी करीत आहेत, त्यामुळे आमदार आवताडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यापुढे शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही आवताडे यांनी दिला.
आमदार आवताडे म्हणाले की, म्हैसाळ योजनेतून सलगर बुद्रूक गावासह काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठीही वेगळ्या पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन करू. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाहिजे तेवढा निधी आणण्यात येईल. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न आगामी निवडणुकीपूर्वी सोडवू.
पाणी प्रश्नाच्या बैठकीसाठी आलेल्या 19 गावांतील शेतकऱ्यांनी आवताडेंना निवेदने दिली. म्हैसाळ योजनेतील सर्व शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसात करा. शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. दुष्काळी म्हणून पिढ्यान्पिढ्या मंगळवेढा तालुक्याची होणारी अवहेलना पुसून काढण्याची भीष्मप्रतिज्ञा मी केली आहे. अडीच वर्षांत मी जेवढा निधी आणला, तेवढा निधी आजपर्यंत कधीही आला नाही, असे आवताडे यांनी नमूद केले.
विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अजून खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. मी मतदारसंघाचे नंदनवन करण्याची शपथ घेतली आहे. टेंभू योजनेचं पाणी मी पहिल्यांदा माण नदीत आणलं. मंगळवेढा तालुक्याचा दक्षिण भाग दुष्काळाच्या झळा सोसतोय यावरही कायमस्वरूपी मार्ग काढणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द खरा ठरवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे, असेही आवताडे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.