
Mangalvedha, 17 June : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. तसेच, राजकीय डावपेचही टाकले जात आहेत. त्यात एकमेकांचे जुने हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहेत. राजकीय वाक्चातुर्यासाठी परिचित असलेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मंगळवेढा दौऱ्यात गुगली टाकली आणि आमदार समाधान आवताडेंना क्लिनबोल्ड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन वेळा निवडून आलेल्या आवताडेंनी चातुर्य दाखवून ढोबळेंचा चेंडू महायुतीच्य नावाखाली टोलावून लावला.
त्याचं झालं असं की, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) हे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळेवढ्याच्या दौऱ्यावर आले होते. तालुक्यातील कार्यक्रम संपल्यानंतर पक्षाचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित जगताप यांच्या मंगळवेढा शहरातील निवासस्थानी चहापानासाठी निमंत्रिक करण्यात आले होते.
मंगळवेढ्यातील (Mangalvedha) रतनचंद शहा बँकेचे संचालक रामचंद्र जगताप यांनी सहकारमंत्री पाटील यांचा सत्कार केला. सत्काराच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे, भाजपचे आमदार समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लतीफ तांबोळी, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे आदी उपस्थित होते
जगताप परिवाराच्या वतीने सहकारमंत्री पाटील यांचा अजित जगताप हे फेटा बांधून स्वागत करत होते. त्याच वेळी मोका साधून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सहकारमंत्र्यांना उद्देशून, ‘साहेब जे तुम्हाला फेटा बांधत आहेत, ते आपल्या पक्षाचे मंगळवेढ्याचे भावी नगराध्यक्ष आहेत,’ असे विधन केले. त्यावर सहकार मंत्र्यांनीही स्मितहास्य करत अनुमोदन दिले.
त्याचवेळी उपस्थित असलेले आमदार समाधान आवताडे यांनी ‘आपल्या म्हणजे कोणत्या पक्षाचे,’ असा सवाल केला. त्या वेळी ढोबळे यांनी ‘सहकार मंत्री पाटील यांच्या पक्षाचे’ म्हणताचआमदार आवताडे यांनी ठीक आहे. मग आमची महायुती आहे,’ असे सांगून महायुतीच्या नावाखाली ढोबळेंनी टाकलेली गुगली टोलावून लावली.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, तर अजित जगताप हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नेते आपला जुना हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सध्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या प्रभाग रचनेची तयारी सुरू आहे. त्यानंतर प्रभागाचे आणि नगराध्यक्षपदाचे आरक्षण निघणार आहे. त्यामध्ये कोणाला लॉटरी लागणार, हे स्पष्ट होणार आहे.
मंगळवेढा नगरपालिकेच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले अजित जगताप हे सध्या नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, ज्या मतदारसंघात भाजपचा आमदार आहे, त्याच पक्षाचा नगराध्यक्ष करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, त्यामुळे महायुती एकत्र लढणार की स्वबळावर निवडणुका लढवणार, यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.