

Solapur, 23 May : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला उतरली कळा लागली आहे. सोलापूर महापलिकेत अवघे दोन सदस्य निवडून आले आहेत, तर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही. पण आता ह्याच ओसाड गावच्या पाटीलकीवरून (जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष) पक्षात जोरदार वाद पेटला. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या निवडीत आर्थिक देवघेव झाल्याचा आरोप करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हटाव मोहिमेचा नारा सोलापुरातून देण्यात आलेला आहे.
काँग्रेसच्या (Congress) जिल्हाध्यक्षपदी पूर्व विभाग सातलिंग शटगार यांची, तर पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यपदी पुन्हा एकदा चेतन नरोटे यांना संधी देण्यात आली आहे. त्यावरून निष्टावंत काँग्रेस कार्यकर्ते म्हणत काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, माढा आणि करमाळा मतदारसंघाचे अशोक चोपडे, सांगोल्याचे राजकुमार पवार, पंढरपूरचे राहुल पाटील, मोहाळचे सुरेश हावळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांवर टीकास्त्र सोडले आहे.
सृजन अभियानाच्या माध्यमातून सामान्य आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आर्थिक देवाणघेवाण आणि गटबाजीच्या आधारे पदांचे वाटप करण्यात आले आहे, असा आरोप या नेत्यांनी केला आहे.
हत्तुरे म्हणाले, तळागाळातील लोकांना पक्षात संधी मिळावी म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सूचनेनुसार सृजन अभियान राबविण्यात आले होते. इच्छुकांची नावं दिल्लीपर्यंत गेली पाहिजे, अशी त्यामागची भावना होती. जयपूर करारात असं म्हटलं होतं की, पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडीत आमदार आणि खासदारांनी हस्तक्षेप करायचा नाही. त्यानुसार ओडिशाचे देवाशिष पटनायक हे जिल्हा निरीक्षक होते. पण परवा जिल्हा आणि शहराध्यक्षाची नावे जाहीर केल्यानंतर त्यात राहुल गांधी यांच्या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम केले गेले आहे.
तुम्हाला बदल करायचा नव्हता, तर एवढं सगळं कशाला केलं. त्याच त्याच लोकांना संधी देणार असाल तर निवडीचा फार्स करायची गरज नव्हती. यातून सर्वसामान्य कार्यकर्त्याची चेष्टा करण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला मात्र, त्यांनी आमची दखलही घेतली नाही, असेही विजयकुमार हत्तुरे यांनी स्पष्ट केले.
हत्तुरे म्हणाले, देशात काँग्रेसची अवस्था वाईट असताना आम्ही पक्षाचे सैनिक म्हणून लढतोय. आमच्या भावना समजून घेतल्या जात नाही. पक्षात संधी आहे, हेही सांगत नाहीत. आम्हाला विश्वासात घेऊन पदांचे वाटप झाले असते तर आम्हाला काय वाटलं नसतं. पण प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आम्हाला जी वागणूक मिळाली आहे, याचा जाब विचारण्यासाठी आम्ही देवाशिष पटनायक यांना फोन केला.
त्या वेळी ‘माझा अहवाल त्यांनी बघितला आहे की नाही, याची शंका आहे’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. झालेल्या निवडी मलाही शॉकिंग आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आम्हाला आंदोलन करण्याचा मार्ग सुचवून पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे. तसेच, सोलापूरचा अहवाल मला विचारल्यानंतर राहुल गांधी यांच्यापुढे मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आम्ही पदाचा सामूहीक राजीनामा देणार असून पक्षात सामान्य कार्यकर्ते, राहुल गांधी यांचे सैनिक म्हणून काम करणार आहोत. पक्षातील प्रस्थापित लोक सर्वसामान्यांना झुरळ समजतात. आता काँग्रेस पक्षातील कॉक्रोच आम्ही काय आहोत, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस मुख्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. तसेच, हर्षवर्धन सपकाळ हटाव मोहिम सोलापुरातून सुरुवात केली आहे. अध्यक्षांनी आमची निवड का झाली नाही, हे सांगितले पाहिजे, असा जाबही हत्तुरे यांनी विचारला.
राजकुमार पवार म्हणाले, सातलिंग शटगार हे जून महिन्यात निवृत्त झाल्यानंतर २५ जुलैला त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाची ऑर्डर निघाली आहे. पण, संदीप साठे हे सध्या हर्षवर्धन पाटील यांच्या भिगवणमधील संस्थेत शिक्षक आहेत. ते इंग्रजी विषय शिकवतात. ते आंदोलनात भाग घेऊ शकत नाहीत. काँग्रेस कमिटीत त्यांना १० वर्षे पहिलं असेल तर सांगावं. साठे यांनी राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री म्हणून सोलापुरात आले, त्या वेळी त्यांच्या स्वागताच्या जाहिराती दिल्या होत्या. ही लाजीरवाणी गोष्ट असून आमच्यावर अन्याय करणारी आहे.
साठे हे बारामतीत राहतात, भिगवमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या संस्थेत काम करतात आणि माढ्यात त्यांचे अजितदादा आणि शरद पवार यांच्या पक्षासोबत संबंध आहेत. मग ते काँग्रेसला न्याय कसा देणार. त्यामुळे त्यांनी एकतर नोकरी सोडून राजकारण करावे किंवा अध्यक्षपद सोडून नोकरी करावी. तुम्हाला नोकरीही पाहिजे, सर्व नेत्यांनाही सांभाळायचे आहे आणि काँग्रेस पक्षात तुम्ही कोणाची सुपारी घेऊन असाल तर माढा लोकसभा मतदारसंघातील कोणतेही निष्ठावंत कार्यकर्ते शांत बसणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.