- अनिल कदम
Sangli Political : घटक पक्षातील कोणी निधीसाठी अर्ज केला की पैसे संपले असे सांगितले जात होते. संजय गांधी निराधार योजनेचे सदस्यत्वही दिले नाही. लहान पक्षांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका. घटक पक्षांना तुम्ही बँडवाले समजू नका, अशा शब्दात रयत क्रांतीचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कानपिचक्या दिल्या.
तर अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी सुरुवातीलाच कार्यक्रमात बसण्यासाठी व्यवस्थित खुर्चीही मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यानंतरही नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभेपर्यंत आपसातले मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करू, असा निर्धार सांगलीतील महायुतीच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
सांगलीत भाजपसह सर्व घटक पक्षांच्या महायुतीचा खरे क्लब येथे मेळावा झाला. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, जनसुराज्य शक्ती रयत, क्रांती संघटना, रिपाई (आठवले गट), पीआरपी (कवाडे गट), भिमसेना, प्रहार जनशक्ती आदी पक्षांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे म्हणाले, सन 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना पंतप्रधान केले. जगातील प्रत्येक देशात भारतीय अभिमानाने, ताठ मानेने जगत आहेत. परराष्ट्र धोरणाबाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले. 2030 पर्यंत भारत जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा जो प्रवास सुरु आहे.
त्यासाठी आपल्याला मोदींना निवडून आणायचे आहे. घटक पक्षाला काही मिळाले नाही तरी आपले प्रश्न देशासमोर छोटे आहेत. त्याचा विचार न करता भारताच्या सन्मानासाठी ही लढाई लढायची आहे. यासाठी महाराष्ट्राने 48 खासदार दिले पाहिजेत. खासदार संजय पाटील म्हणाले, सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून आजवर न झालेले काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी दोन हजार कोटी मिळाले. एक हजार कोटीच्या कामाचे टेंडर निघून काम सुरू झाले आहेत. तसेच टेंभू योजनेच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून ती कामे सुरू होतील. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी चौदाशे कोटी मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार बाबर म्हणाले, मोदींनी देशात, राज्यात भरपूर विकास कामे केली आहेत.
ही कामे लोकापर्यंत पोहोचविणे आपली जबाबदारी आहे. 2014 पासून भाजप सोबत एकत्रित काम करीत आहे. राज्यातील सत्तांतरानंतर टीकाटिपणी झाली. मात्र डगमगलो नाही. येणार्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाकडून कोणतीही चूक होणार नाही. कुठे चूक होत असेल तर सांगा ती दुरूस्त करू. मोदी पंतप्रधान झालेच पाहिजेत. यासाठी एकत्रितपणे काम करावे. त्यानंतर आपले मतभेद असतील तर पाहू.
आम्हाला बँडवाले समजू नका...
सदाभाऊ खोत म्हणाले, रामराज्य आणण्यासाठी आम्ही मोदींच्या सोबत आहोत. मात्र घटक पक्ष चळवळीतील आहेत. निवडणूक जवळ आल्याने घटक पक्षाची आठवण झाली आहे. आम्ही तुम्हाच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीत विरोधी पक्षांचे तण काढतो. पण तण काढणारा उपाशी राहता कामा नये.
सत्ता आल्यानंतर घटक पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना विकासकामासाठी कधी डीपीसीमधील निधी दिला असता तर चालले असते. घटक पक्षातील कोणी निधीसाठी अर्ज केला की पैसे संपले असे सांगितले जात होते. संजय गांधी निराधार योजनेचे सदस्यत्वही दिले नाही. लहान पक्षांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका. घटक पक्षांना तुम्ही बँडवाले समजू नका, अशा शब्दात कानपिचक्या दिल्या.
वैभव पाटील यांची नाराजी
वैभव पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच कार्यक्रमात बसण्यासाठी व्यवस्थित खुर्चीही मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ते म्हणाले, आम्ही महायुतीत लेट आलो, पण थेट आलो हे लक्षात घ्या. त्यामुळे युतीचे आमच्यावर लक्ष राहूदे. या मेळाव्यास काहीजण शरीराने आले. मात्र मनाने नाही. परंतु असे करू चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सर्वांनी अडचणी, मतभेद बाजूला ठेवू आणि मनापासून एकत्रित काम करू.
मोदीचा तिसर्यांदा राज्याभिषेक करायचा
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, शेवटच्या घटकांना न्याय देण्याचे काम भाजपाने केले. मोदीचा तिसर्यांदा राज्याभिषेक करायचा आहे. सांगलीतून भाजपाचा खासदार देण्यासाठी सर्वांनी मनापासून काम करावे. गेल्या निवडणुकीत विरोधात होतो. मात्र आता भाजपमध्ये आहे. पृथ्वीराज देशमुख लोकसभेसाठी इच्छुक आहेत. प्रत्येकाला तिकिट मागण्याचा अधिकार आहे. मात्र एकदा का पक्षाने उमेदवारी निश्चित केली की सर्वांनी त्याच्या पाठिंशी राहून काम करावे.
पृथ्वीराज देशमुख म्हणाले, घटक पक्षांनी काही चूक झाल्यास सांगावे. ती दुरुस्त करून घेऊ. घटक पक्षांची समन्वय समितीकरून महिन्याला बैठक घेऊ आणि चर्चा करू. मनात शंका कुशंका न बाळगता एकसंधपणे लढायचे आहे. शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे म्हणाले, मोदींनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अठरा तास काम करत आहेत. खांद्याला खांदा लावून प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाऊ.
रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत जाणे आवश्यक होते. तशा पोचल्या नाहीत याची खंत वाटते. आमच्या माध्यमातून योजना लोकांपर्यंत पोहोचवा. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, महिला आघाडीच्या नेत्या स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळ उपस्थित होते.
तसेच जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील, महायुतीमधील पक्षाचे पदाधिकारी हजर होते. पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी सूत्र संचालन केले. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी स्वागत केले तर शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी आभार मानले.
(Edited By Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.