

Satara, 19 September : सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून अंतिम मतदारयादीही जाहीर झाली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. बॅंकेच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत अनेकांनी मतांची पेरणी केली, तर काहींनी नवी गणिते जुळविल्याचे दिसून आली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने फोडाफोडीचे राजकारण केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी २०१९ मतदारांची यादी अंतिम झाली आहे. हे मतदार सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक ठरवणार आहेत. मात्र, महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भारतीय जनता पक्षाने जिल्हा बॅंकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीची कमान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले संभाळणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केले आहे.
भाजपच्या स्वबळाच्या घोषणेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. बॅंकेत राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद मोठी आहे. मात्र, भाजपची जिल्हा परिषदेतील तिरकी चाल पाहून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सामूहीक पॅनेलबाबत चर्चा केली आहे. मात्र, त्याबाबतची गाडी अजूनही रुळावर असल्याचे दिसून येते.
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, बॅंकेचे अध्यक्ष तथा खासदार नितीन पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अनिल देसाई, प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, रामभाऊ लेंभे, सुनील खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बॅंकेत निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. विशेष म्हणजे भाजपचे नेतेमंडळी वगळता इतर प्रमुख नेते या उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असूनही भाजपने फोडाफोड करत झेडपीची सत्ता काबीज केली होती. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत स्थानिक नेत्यांनी अजूनही पौळ पाळले आहे. स्थानिक नेत्यांनी तर त्याबाबत भाष्य करणेही टाळले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळगावी दरे येथे आले आहेत. त्या ठिकाणी बोलताना त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले आहे.
आता सर्वांनी एकत्रितपणे महायुती म्हणून निवडणुका लढवल्या पाहिजेत, अशी माझी भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मताप्रमाणे महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रितपणे लढवणार का याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.