

Satara, 26 April : विधान परिषदेवर वर्णी लागावी, यासाठी अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या वाट्याला सर्वाधिक जागा येत असल्याने त्यांच्याकडे इच्छुकांची संख्याही मोठी आहे. शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा येत असून एका जागेवर नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडी आणि आमदार महेश शिंदे यांची भूमिका पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधान परिषदेची एक जागा साताऱ्याला देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी फलटणच्या धाकट्या राजेंचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
विधान परिषदेच्या नऊ जागांपैकी पाच जागा ह्या भारतीय जनता पक्षाला, दोन जागा शिवसेनेला (Shivsena), तर एक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे. तसेच, प्रज्ञा सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे त्यांचीही एक जागा भाजपकडेच राहणार आहे, त्यामुळे भाजपला या निवडणुकीत एकूण सहा जागा मिळणार आहेत.
शिवसेनेकडून कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता आहे. मध्यंतरी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी धक्कादायक निर्णय घेत भल्याभल्यांना डावलून सर्वसामान्य घरातून पुढे आलेल्या ज्योती वाघमारे यांना संधी दिली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत ते कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेनेकडून बहुमत असूनही भाजपने कुटील डाव खेळत सत्ता मिळविली. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार शिंदे यांच्यावर नाराज असल्याचे पुढील घडामोडीवरून दिसून आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच सातारा दौरा झाला. त्या दौऱ्यातही महेश शिंदे हे सहभागी झाले नव्हते. उलट त्यांनी पालकमंत्री देसाई यांच्यावरच हल्लाबोल केला होता. वास्तविक साताऱ्यात शिवसेनेचे दोनच आमदार आहेत. त्यातील महेश शिंदे हे मध्यंतरीच्या घडामोडीमुळे पक्षापासून दुरावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एक जागा साताऱ्याला जाण्याची सर्वाधिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरपालिका निवडणुकीवेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे आपल्या गटासह शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना वाढविण्यासाठी साताऱ्यातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना संधी दिली जाऊ शकते.
शिवसेनेची सद्यस्थिती आणि वाढीला असलेली संधी पाहता राजे गटाला एकनाथ शिंदे यांच्याकडून बळ दिले जाऊ शकते. महेश शिंदे यांनी पक्षापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला तर पक्षवाढीसाठी संजीवराजेंना विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.